US Firing – वॉशिंग्टनमध्ये गोळीबारात हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू, स्पोकेन काउंटीचे दोन डेप्युटी गंभीर जखमी
अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू झाला असून स्पोकेन काउंटी शेरीफ कार्यालयाचे दोन डेप्युटी गंभीर जखमी झाले आहेत. स्पोकेनपासून सुमारे 18 मैल दक्षिणेस असलेल्या ‘स्पँगल’ शहरातील ‘साउथ स्मायथ रोड’ परिसरात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका घरात ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका महिलेवर तिच्या भावाने गोळी झाडली होती. जीव वाचवण्यासाठी ती घरातून पळून शेजाऱ्याच्या घरी जाऊन लपली होती. ड्रोनद्वारे संशयिताचा शोध घेत असताना अधिकाऱ्यांना घराच्या आवारात एक व्यक्ती पडलेली दिसली. डेप्युटींनी त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. स्वॅट पथकाचे सदस्य आणि डेप्युटी घराच्या दिशेने पुढे गेले असता हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन डेप्युटी गोळीबारात गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घराच्या आत आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, संशयित व्यक्तीचाही मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.
Comments are closed.