भाजपा महायुती सरकारकडून बळीराजाची क्रूर थट्टा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ हजारात दिवाळी करून दाखवावी – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळून निघालेला असताना सरकारने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दिवाळी आली तरी सरकारची मदत काही पोहचलेली नाही, केवळ ५ हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गगणाला भिडलेल्या महागाईत ५ हजार रुपयात दिवाळी करून दाखवावी, असे आव्हान देत, हेक्टरी १ लाख रुपये देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. हे सरकार फक्त मोजक्या उद्योगपतींचे असून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे त्यांना काहीही देणेघेणे नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा सोडल्या असून महिलांचा अपमान करण्यातही ते मागे नाहीत. एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाने केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावरील महारॅलीच्या वेळी बसमधील काँग्रेस खासदारांच्या एका व्हिडिओमधील काही सेकंदाचा भाग सर्व माध्यमातून प्रसारित करून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओतील दोन्ही खासदारांचे बहिण-भावाचे नाते आहे, त्यांच्या नात्यावर संशय घेत भाजपाने महिला खासदाराचाही अपमान केला आहे. याप्रकरणी कोणाही कोणतीही तक्रार केलेली नाही पण फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या भाजपावर मात्र काँग्रेस पक्ष कारवाई करण्यासाठी योग्य त्या यंत्रणेकडे तक्रार दाखल करेल असे सपकाळ म्हणाले.

Comments are closed.