IPL 2026 – शतकांचा महापूर… आयपीएलचा शतक विक्रम धोक्याच्या वळणावर
आयपीएल म्हणजे पूर्वी चौकार-षटकारांचा तमाशा होताः आता तो थेट शतकांचा जत्रोत्सव झालाय. पूर्वी एखादं शतक झळकलं की समालोचकांचा आवाज भरून यायचा, प्रेक्षक उभे राहायचे आणि गोलंदाज ड्रेसिंगरूममध्ये जाऊन थंड पाण्याचा टॉवल डोक्यावर ठेवून बसायचे. आता मात्र शतकं इतक्या सहज झळकू लागली आहेत की, गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करणाराही एव्हरेस्ट चढू लागलाय.
यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीचे दोन आठवडे मात्र विचित्र शांततेत गेले. एकही शतक नव्हते. जणू फलंदाजांनी सामूहिक उपवास धरला होता. क्रिकेटप्रेमींना काळजी वाटायला लागली होती की ‘बॅट्सवर बंदी आली का?’ पण १८ व्या सामन्यात संजू सॅ मसनने पहिलं शतक ठोकलं आणि मग जणू शतकांचा बांध फुटला. त्या एका शतकाने बाकी फलंदाजांना रक्ताची चव लागलेल्या वाघांसारखं केलं. आता ५८ सामन्यांत तब्बल १३ शतकं झळकली आहेत आणि अजून १६ सामने बाकी आहेत. म्हणजे २०२४ मधील १४ शतकांचा विक्रम आता आयसीयूमध्ये दाखल झालाय. कधीही या विक्रमाची विकेट पडू शकते.
या साऱ्या धुमाकुळामागे सर्वात मोठा संशयित म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम. हा नियम लागू झाल्यापासून फलंदाज जणू नेट प्रॅक्टिससारखे खेळतायत आणि गोलंदाजांना विमा कंपनीकडून ‘जोखीम भत्ता’ मिळायला हवा अशी परिस्थिती निर्माण झालीय. आयपीएलमध्ये २०२३ मध्ये पहिल्यांदा १२ शतके ठोकली होती. पुढच्या वर्षी १४. गेल्या मोसमात जरा श्वास घेण्याची संधी मिळाली आणि आकडा नऊवरच थांबला. पण यंदा पुन्हा फलंदाजांनी शतकांचा रॉकेट लाँचर सुरू केलाय. जो सुस्साट आहे.
बुधवारी विराट कोहलीने त्याच्या बॅ टमधून नववे आयपीएल शतक ठोकले आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या दरबारात ‘राजा अजून जिवंत आहे’ हे दाखवून दिले. विराट म्हणजे ‘आयपीएलच्या शतकविश्वा’चा अमिताभ बच्चन. बाकी सारे स्टार असतील, पण सिंहासनावर बसलेला बादशहा तोच. त्याच्या मागे सात शतकांसह जोस बटलर आहे, पण विराटच्या उंच मनोऱ्यावर पोहोचायला अजून लिफ्ट बसवायची आहे.
विशेष म्हणजे आरसीबी हा आयपीएलमध्ये २० शतकांचा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरलाय. त्यातली तब्बल नऊ शतके एकट्या विराटची. म्हणजे आरसीबीच्या शतकांच्या इमारतीचा मुख्य कॉण्ट्रॅक्टर एकटाच विराट आहे. चेन्नईची १९ शतकं मागे पडलीत आणि बंगळुरूने थेट ‘नंबर वन’चा झेंडा रोवलाय.
संजू सॅमसनने यंदाच्या शतक महोत्सवाचा नारळ फोडला आणि त्यानेच दुसरे शतकही पूर्ण केलं. विशेष म्हणजे दोन्ही वेळा नाबाद. म्हणजे संजू फक्त शतक करून थांबला नाही, तर गोलंदाजांना पूर्ण शिक्षा भोगायला लावूनच मैदानातून बाहेर पडला. दुसरीकडे अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीसारखे धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या ३० चेंडूंतील वेगवान शतकाच्या विक्रमाभोवती घिरट्या घालतायत. तसाही गेलचा विक्रम आता किल्ला राहिलेला MINOS नाहीः त्याच्या
भिंतींवर तडा पडायला सुरुवात झालीय.
या वारंवारच्या ‘शतक महोत्सवा’ मुळे आयपीएलच्या इतिहासात आजवर ६१ फलंदाजांनी १२३ शतके साकारली आहेत. त्यात ३१ हिंदुस्थानी शतकवीर आहेत. पहिल्याच आयपीएल सामन्यात बॅण्डन मॅकलमने ठोकलेली १५८ धावांची नाबाद खेळी उभी होती. त्या रात्री लोकांना वाटलं होतं, ‘हे पुन्हा होणं शक्य नाही!’ पण आयपीएलने क्रिकेटला एवढं बदललं की, आता १५० धावा म्हणजे लोकांना ‘चांगली सुरुवात’ वाटू लागलीय. पण वास्तव हे आहे की, आयपीएलमध्ये १५० धावांचा टप्पा पराक्रमच आहे.
आयपीएलमध्ये सलग शतकांचा पराक्रमही फार मोजक्यांनी केलाय. शिखर धवन, जोस बटलर, विराट कोहली आणि शुभमन गिल. या चौघांनी सलग दोन सामन्यांत शतके ठोकून सातत्यालाही फटकेबाजीचा हेल्मेट घातला. आज आयपीएलमध्ये गोलंदाजांची अवस्था एखाद्या जुन्या हिंदी सिनेमातील पोस्टमनसारखी झाली आहे. तो फक्त येतो आणि मार खाऊन परत जातो. फलंदाज मात्र बॅटला तलवार समजून मैदानात उतरलेत. सध्याचा फलंदाजांचा वेग पाहता १४ शतकांचा विक्रम मोडणार हे सूर्य उगवण्याइतकं निश्चित आहे. आता उत्सुकता फक्त एवढीच आहे. पुढचे शतक कोण ठोकणार आणि कोणत्या गोलंदाजाच्या करिअरवर त्याची सही उमटणार?
Comments are closed.