IPL 2026 – मी कोणालाही उत्तर देण्यास बांधील नाही; वेपिंगमुळे वादात अडकलेल्या रियान परागचे वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या सामन्यात 450 हून अधिक धावांचा पाऊस पडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या लढती दिल्लीने राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 226 धावांचे आव्हान दिल्लीने केएल राहुल (75) आणि पथुम निसंकाच्या (62) अर्धशतकीय खेळीच्या बळावर 5 चेंडू बाकी असताना पूर्ण केले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 6 बाद 225 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने 50 चेंडूत 90 धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले. यंदाच्या हंगामातील रियान पराग याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. अर्थात या खेळीनंतरही सुमार गोलंदाजीमुळे राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला. हा सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रियान पराग याने आपल्यावर टीका करणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिले.
यंदाच्या हंगामामध्ये रियान पराग याचा फॉर्म हा राजस्थानसाठी चिंतेचा विषय ठरला होता. सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी खोऱ्याने धावा काढत असल्याने रियानची कामगिरी झाकोळली जात होती. आयपीएलचा हंगाम मध्यावर आल्यानंतरही त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्यात ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतरही त्याच्यावर टीका होऊ लागली होती. बीसीसीआयनेही त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.
दरम्यान, या खेळीतून टीकाकारांना उत्तर दिले का? असे रियानला पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले. यावर बोलताना तो म्हणाला की, मला कोणालाही उत्तर देण्याची किंवा टीकाकारांवर बोलण्याची गरज वाटत नाही. शेवटी मैदानात उतरून संघाला 2 गुण मिळवून देणे हे माझे काम आहे. जर संघ हरला असेल तर माझ्या वैयक्तिक धावांशी काहीही देणेघेणे उरत नाही. तसेच 200 धावा करूनही पराभव स्वीकारावा लागला यावरही त्याने भाष्य केले. 225 ही या खेळपट्टीवर समाधानकारक धावसंख्या होती. आम्ही मधल्या षटकांमध्ये अधिक चांगली गोलंदाजी करायला हवी होती. एकाच षटकात वारंवार चौकार गेल्यामुळे सामना आमच्या हातातून निसटला, असे तो म्हणाला.
वेपिंगचा वाद काय?
दिल्लीविरुद्ध वादळी खेळी करण्यापूर्वी रियान पराग एका मोठ्या वादात अडकला होता. मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करताना तो कॅमेऱ्यात कैद झाला होता. बीसीसीआयने या घटनेची गंभीर दखल घेत रियान परागला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला. तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जमा करण्यात आला.
Comments are closed.