IPL 2026 – हैदराबाद जिंकूनही तिसराच
टॉप टू मध्ये येण्यासाठी 255 धावांचे आव्हान उभारणाऱ्या हैदराबादने बंगळुरूला 200 धावांवर रोखत 55 धावांनी मोठा विजय मिळवला, मात्र नेट रनरेट बाबतीत ते गुजरातला मागे टाकण्यात थोडक्यात कमी पडले. त्यामुळे आता त्यांना आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यासाठी 27 मे रोजी एलिमिनेटरची लढत खेळावी लागणार आहे. तसेच 26 मे रोजी क्वालिफायर वनमध्ये बंगळुरूची गाठ गुजरातशी पडेल.
धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या वेंकटेश अय्यरने 44 धावा ठोकल्या, पण विराट कोहली (15), देवदत्त पडिक्कल (21) हे जोरदार खेळ करू न शकल्यामुळे बंगळुरूने विजयाचा पाठलाग सोडूनच दिला. कर्णधार रजत पाटीदार (56) आणि कृणाल पंडय़ाने (नाबाद 41) फटकेबाजी करून संघाला 200 पर्यंत नेले आणि बंगळुरूचे अव्वल स्थान कायम राखले.
तत्पूर्वी हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रव्हिस हेडने नेहमीप्रमाणे फटकेबाजी सुरू केली, पण 4 षटकांत 45 धावांची भागी केल्यानंतर हेड (26) बाद झाला. त्यानंतर अभिषेक सुस्साट सुटला आणि त्याने 5 षटकार आणि 4 चौकार खेचत 22 चेंडूंत 56 धावा ठोकल्या. आज त्याचे षटकार भलतेच लकी ठरले. सुयश शर्माला खेचलेला फटका सीमारेषेजवळ बदली खेळाडू जॉर्डन कॉक्सने अलगद टिपला, पण त्याच्या शूजने सीमारेषेला स्पर्श केल्यामुळे पंचांनी षटकार दिला. मग त्याने पुढच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार खेचला, पण तो पडिक्कलच्या हातातून निसटत षटकार झाला. पुढेही अभिषेकने उत्तुंग षटकार मारला, पण तोसुद्धा क्षेत्ररक्षकाच्या हातात आला नाही. मात्र त्यानंतर जॉर्डननेच त्याचा सोपा झेल टिपला.
तो बाद झाल्यावर इशान किशन आणि हेन्रीक क्लासनने बंगळुरूच्या गोलंदाजीची पिसे काढली. दोघांनी 113 धावांची भागी केली असली तरी 13 ते 16 या चार षटकांत 7 षटकार आणि 5 चौकार खेचले. क्लासनने 51 धावा ठोकल्या तर इशानने 79 धावांची खेळी केली. शेवटच्या सहा षटकांत 109 धावा चोपणाऱ्या हैदराबादला 19 आणि 20 षटकांत केवळ 17 धावाच काढता आल्या.
Comments are closed.