विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या
आयपीएल 2026 ऑरेंज कॅप अपडेट : आयपीएल 2026 मधील मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा तब्बल 82 धावांनी धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे बदल पाहायला मिळाले.
हेन्रिक क्लासेनच्या डोक्यावर अजूनही ऑरेंज कॅप
आयपीएल 2026 च्या 56 व्या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेन अजूनही ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. क्लासेनने यंदाच्या हंगामात 12 सामन्यांतील 12 डावांत 50.80 च्या सरासरीने आणि 153.94 च्या स्ट्राइक रेटने 508 धावा केल्या आहेत. या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून तो सध्या अव्वल स्थानी आहे.
साई सुदर्शनची मोठी झेप, टॉप-5 मध्ये जबरदस्त चुरस
गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज साई सुदर्शनने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने खेळलेल्या 61 धावांच्या शानदार खेळीमुळे त्याच्या नावावर आता 501 धावा जमा झाल्या आहेत. त्याने 12 डावांत 41.75 च्या सरासरीने आणि 155.11 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.
⚡️ 2025 मध्ये ऑरेंज कॅप विजेता
⚡️ 2026 मध्ये 500 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडूसाई सुदर्शन अत्यंत सातत्यपूर्ण आहे 👏#IPL2026 #GTvSRH pic.twitter.com/nqKvqDl3Eo
— Cricbuzz (@cricbuzz) 13 मे 2026
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा 12 डावांत 481 धावांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज लोकेश राहुल 477 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल 11 डावांत 467 धावा करत टॉप-5 मध्ये टिकून आहे.
वैभव सूर्यवंशी-अय्यर टॉप-10 मध्ये, कोहली बाहेर
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशी सहाव्या स्थानावर आहे. त्याने 11 डावांत 440 धावा करत 236 च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन 430 धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. त्याने यंदा 53.75 ची सरासरी आणि 169.29 चा स्ट्राइक रेट राखला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा इशान किशन 420 धावांसह आठव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सचा कूपर कोनोली 415 धावांसह नवव्या क्रमांकावर असून त्याने 51.58 ची सरासरी राखली आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर 392 धावांसह दहाव्या स्थानी कायम आहे. दरम्यान, विराट कोहलीला मोठा धक्का बसला असून तो आता टॉप-10 मधून बाहेर फेकला गेला आहे. कोहलीने 11 डावांत 379 धावा केल्या असून तो सध्या ऑरेंज कॅप लीडरबोर्डमध्ये 13 व्या स्थानावर घसरला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.