16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल 2026 लाइव्ह अपडेट : आज आयपीएल 2026 मध्ये आणखी एका थरारक सामन्याची रंगत पाहायला मिळणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीने आता जबरदस्त वेग घेतला असून प्रत्येक सामना संघांसाठी ‘करो या मरो’ ठरत आहे. काल रात्री गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा तब्बल 82 धावांनी धुव्वा उडवत थेट गुणतालिकेच्या अव्वल स्थानावर झेप घेतली. काही दिवसांपूर्वी टॉपवर असलेली हैदराबादची टीम आता तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. गुजरातने 16 गुणांचा जादुई टप्पा पार केला असून प्लेऑफचे दार जवळपास उघडले आहे. मात्र हैदराबाद अजूनही धोक्याच्या वर्तुळात अडकलेली आहे. त्यामुळे आजचा सामना देखील दोन संघांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

आज IPL मध्ये कोणाचा सामना?

आयपीएलच्या 19व्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. दोन्ही संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम असले तरी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आरसीबी प्लेऑफच्या उंबरठ्यावर उभी आहे, तर कोलकात्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

गुणतालिकेत बंगळूरूने 11 सामन्यांत 7 विजय आणि 4 पराभवासह 14 गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. आजचा सामना जिंकला तर आरसीबीही गुजरातप्रमाणे 16 गुणांपर्यंत पोहोचेल आणि प्लेऑफचे तिकीट जवळपास निश्चित करेल. त्यांचा नेट रनरेटही दमदार असल्याने ते पुन्हा टेबल टॉपर बनू शकतात.

दुसरीकडे कोलकात्याची परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यांनी 10 पैकी फक्त 4 सामने जिंकले, 5 गमावले तर 1 सामना निष्फळ ठरला. सध्या त्यांच्या खात्यात 9 गुण असून ते आठव्या स्थानावर आहेत. कोलकात्याचे अजून 4 सामने बाकी आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उरलेले चारही सामने जिंकणे जवळपास अनिवार्य आहे. एक जरी पराभव झाला तरी त्यांचे समीकरण पूर्णपणे बिघडू शकते.

Comments are closed.