GT vs SRH: कॅप्टन गिलने सांगितले गुजरात टायटन्सच्या विजयामागचे रहस्य! म्हणाला, “खेळपट्टी पाहिल्यानंतर…”

आयपीएल २०२२ चा विजेता संघ गुजरात टायटन्स सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आयपीएल १९ व्या हंगामात जो काही सामने जिंकण्याचा सपाटा लावला आहे, तो कायम राखला आहे. मग घरचे मैदान असो वा बाहेरचे त्यांनी सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी करत बलाढ्या संघांना पराभूत केले आहे. मंगळवारी (१२ मे) त्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैद्राबादचा विक्रमी पराभव केला आहे. त्यांच्या या लागोपाठच्या विजयामागचे रहस्य काय हे जाणून घ्यायला सर्वच जण आतुर असून कर्णधार शुबमन गिलने ते सांगितले आहे.

हैद्राबाद विरुद्धच्या विजयानंतर गिल म्हणाला, “त्याचा संघ कोणत्याही विशिष्ट शैलीने किंवा ब्रॅंडने क्रिकेट खेळत नाही. आम्हाला अशी टीम बनायचे आहे, जी खेळपट्टीचे स्वरूप पाहते आणि तेथील परिस्थितीचा अचूक अंदाज घेते. जर खेळपट्टी अशी असेल की, जिथे प्रथम फलंदाजी करताना २४० धावा करणे शक्य आहे, तर आम्ही नक्कीच त्या दिशेने प्रयत्न करतो. पण त्याच वेळी, हे ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे की, जर खेळपट्टीवर धावा करणे फारसे सोपे नसेल, तर अशा वेळी १४०-१५० धावा करण्यापेक्षा १७०-१८० धावा करणे हे अधिक श्रेयस्कर ठरते. आम्ही परिस्थितीचा विचार करतो. अंदाज घेऊनच, त्यानुसार आम्हाला खेळायला आवडते.”

समालोचकाने हा एक वेगळ्या प्रकारचा विजय होता का विचारले असता गिल म्हणाला, “नक्कीच, जसे तुम्ही म्हणाले आहात की प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माझ्यामते, आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. अशा खेळपट्टीवर १७० धावा करणे कठीण असणार आहे, हे आम्हाला नेहमीच माहित होतो, त्यामुळे आम्ही जर चांगली गोलंदाजी केली करत सामन्यात टिकून राहू.”

अहमदाबादमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यांनी साई सुदर्शन (६१) आणि वॉशिंग्टन सुंदर (५०) यांच्या अर्धशतकांमुळे २० षटकांत ५ विकेट्स गमावत १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैद्राबादचा संघ १४.५ षटकांतच ८६ धावसंख्येतच गारद झाला.

या हंगामात पाहिले तर गुजरातने या सामन्यानंतर गुणतालिकेचे अव्वल स्थान, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप या सर्वांवर कब्जा केला आहे.

Comments are closed.