मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? हार्दिक पांड्याशिवाय धर्मशालाला पोहोचली टीम, सूर्याही अचानक गायब, न
मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 : आयपीएल 2026 मध्ये सतत संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या संघासमोर आता कर्णधार हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं मोठं संकट उभं राहिलं आहे. पंजाब किंग्सविरुद्ध धर्मशालामध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी हार्दिक संघासोबत प्रवास करताना दिसला नाही, त्यामुळे तो पुढच्या सामन्यात खेळणार का याबाबतचा सस्पेन्स आणखी गडद झाला आहे.
धर्मशालामध्ये पोहोचली MI, पण हार्दिक गायब
मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ 11 मे रोजी दुपारी धर्मशालामध्ये पोहोचले. मात्र, संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या या ग्रुपसोबत नव्हता. मागील दोन सामन्यांपासून पाठीच्या दुखापती आणि स्नायू ताणाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या हार्दिकच्या अनुपस्थितीने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
पण, संघाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिकच्या खेळण्याच्या आशा पूर्णपणे संपलेल्या नाहीत. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, मुंबईत वैद्यकीय टीमकडून त्याच्या दुखापतीचे सातत्याने परीक्षण सुरू आहे. गरज भासल्यास तो नंतर धर्मशालासाठी रवाना होऊ शकतो.
विशेष म्हणजे, मागील सामन्यापूर्वीही हार्दिक उशिरा संघात सामील झाला होता. मात्र, अखेरीस तो प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला नव्हता. सोशल मीडियावर त्याच्या फिटनेसबाबत विविध चर्चा रंगत असल्या तरी संघातील सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की, हा विषय फक्त दुखापतीशी संबंधित आहे.
हार्दिकच्या फिटनेसवर मोठा सस्पेन्स
हार्दिकसाठी आयपीएल 2026 हंगाम फारसा खास ठरलेला नाही. त्याने आठ सामन्यांत केवळ 146 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत फक्त चार विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याची अनुपस्थिती संघासाठी आणखी मोठा धक्का मानली जात आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादवहाही संघासोबत धर्मशालामध्ये पोहोचलेला नाही. मात्र, त्याची अनुपस्थिती वैयक्तिक कारणांमुळे असल्याचं सांगितलं जात आहे. नुकताच सूर्यकुमार पिता बनला असून तो सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. हार्दिकच्या गैरहजेरीत भारताचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाची धुरा सांभाळली होती. याआधी 10 मे रोजी रायपूरमध्ये झालेल्या सामन्यादिवशीही तो थेट टीममध्ये सामील झाला होता आणि यावेळीही तो उशिराने धर्मशालामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सचं अभियान जवळपास संपुष्टात
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. संघाने 11 सामन्यांत फक्त तीन विजय मिळवले असून पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर घसरला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईसमोर आता पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्धचे उर्वरित सामने औपचारिकता म्हणून उरले आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.