सामनावीर नव्हे, आयपीएलवीर एकाच वेळी महत्त्वाचे तीन पुरस्कार जिंकणारा वैभव एकमेवाद्वितीय

क्रिकेटचा विचित्रपणा नवा नाही. एखादा खेळाडू सामनावीराचा पुरस्कार जिंकत राहतो, पण हंगाम संपल्यावर त्याचे नाव कुठेच दिसत नाही. दुसरीकडे एक पोरगा असा येतो की, एकदाही सामनावीर होत नाही; पण संपूर्ण स्पर्धा त्याच्या नावाची होते. ‘सिक्सर प्रिन्स’ वैभव सूर्यवंशीने यंदा हेच करून दाखवले. राजस्थान रॉयल्सला जेतेपद जिंकता आले नाही. अंतिम टप्प्यावर त्यांची गाडी रुळावरून घसरली, पण त्या गाडीचा इंजिन ड्रायव्हर वैभव होता. जे वैभवने केले ते याआधी कुणालाही जमले नव्हते. कप आरसीबीच्या घरी गेला खरा, पण आयपीएलची खरी कमाई वैभवने उचलून नेली. ऑरेंज पॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आणि सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू हे तिन्ही मानाचे मुकुट त्याने एकाच वेळी आपल्या डोक्यावर चढवले. हा या प्रिन्सचा राज्याभिषेकच होता. एवढेच नव्हे तर, त्याने सुपर स्ट्रायकर आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रम नोंदवत आणखी दोन पुरस्कार जिंकले.

क्रिकेटच्या बाजारात पुरस्कारांची इतकी मोठी लॉटरी क्वचितच लागते. 16 डावांत 776 धावा. स्ट्राइक रेट तब्बल 237.30. षटकारांचा आकडा 72. हे आकडे नसून गोलंदाजांच्या स्वप्नांवर चालवलेला बुलडोझर आहे. गोलंदाज चेंडू टाकायला यायचे आणि वैभव त्याला थेट प्रेक्षकांत पाठवायचा. जणू काही सीमारेषेपलीकडे त्याने स्वतःची मालमत्ता घेतली होती. त्याचे षटकार म्हणजे फटके नव्हते, ती क्षेपणास्त्रs होती. चेंडू टाकला रे टाकला की ‘टण’ असा आवाज आणि प्रेक्षकांनी फक्त ‘वर’ बघायचं. चेंडू गॅलरीत, कधी स्टेडियमच्या छपरावर, तर कधी थेट अहमदाबाद ते जयपूर प्रवासाला जायचा. यंदाच्या आयपीएलच्या कथेत तो प्रत्येक पानावर होता. काही खेळाडू पुरस्कार जिंकतात, काही इतिहास रचतात. वैभवने दोन्ही जिंकले. 2011 नंतर एका हंगामात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक स्ट्राइक रेट या दोन्ही बाबतीत अव्वल राहण्याचा पराक्रम त्याने केला.

हे पुरस्कार स्वीकारताना वैभवने पुढील हंगामात आणखी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. फिटनेस सुधारण्याची गरजही त्याने मान्य केली. हे ऐकून विरोधी गोलंदाजांचे टेन्शन आणखी वाढले असेल. कारण हा मुलगा अजून पूर्ण तयारच झालेला नाही; आणि तरीही त्याने आयपीएल हादरवून सोडली आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱया सचिन तेंडुलकरनेही वैभवच्या मनगटाच्या ताकदीचे आणि चेंडूची लांबी ओळखण्याच्या क्षमतेचे काwतुक केले. सचिनसारखा खेळाडू जेव्हा दुसऱया खेळाडूला दाद देतो, तेव्हा ती प्रशंसा सोन्यावर सुगंध ठरते. जरी वैभव तडाखेबंद खेळूनही एकदाही सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला नाही, कपही बंगळुरूने जिंकला; पण यंदाची आयपीएल वैभवनेच जिंकलीय हे कुणीही नाकारू शकत नाही.

वैभवचे पुरस्कार

 सर्वाधिक धावांची (776) ऑरेंज कॅप
 मोस्ट व्हॅल्युएबल पुरस्कार
 सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू
 सर्वाधिक षटकार (72)
 सर्वाधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी (237.30)

हे दोन पुरस्कार मिळवणारा पहिलाच खेळाडू

सूर्यवंशीने 16 डावांत 237.30च्या तुफानी स्ट्राइक रेटने 776 धावा फटकावत संपूर्ण स्पर्धेत धुमाकूळ घातला. आयपीएलच्या एका हंगामात एमव्हीपी आणि उदयोन्मुख खेळाडू हे दोन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. तसेच 2011 नंतर धावा आणि स्ट्राइक रेट या दोन्ही बाबतीत अव्वल राहणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने 72 षटकार ठोकत ख्रिस गेलचा एका हंगामातील 59 षटकारांचा विक्रमही मोडला.

Comments are closed.