प्रत्येक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल; अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचा कठोर इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमक्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. इराणच्या सशस्त्र दलाचे जनरल स्टाफ आणि खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाने मंगळवारी एक संयुक्त निवेदन जारी करून अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही हल्ल्याला सजेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल. इराणवर हल्ला झाल्यास आणखी गंभीर, विनाशकारी आणि अनपेक्षित तीव्र हल्ले करण्यात येतील, असा इशारा इराणने दिला आहे.

इराणच्या लष्करी कमांडने संयुक्त राष्ट्र महासभेतील ट्रम्प यांच्या वक्तव्याला प्रचारकी म्हटले आहे. इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, ते हल्लेखोरांविरुद्ध अधिक तीव्र आणि विनाशकारी प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.अमेरिकेच्या धमक्यांमुळे इराणची लष्करी भूमिका बदलणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्राला संबोधित करताना इराणबाबत एक महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की त्यांच्यासमोर एक मोठा निर्णय आहे. ट्रम्प यांनी सूचित केले की इराणसोबतचा करार वाटाघाटींसाठी पर्याय उघडू शकतो, परंतु जर करार झाला नाही, तर ते इराणविरुद्ध अधिक कठोर लष्करी कारवाई करून त्याला नष्ट करू शकतात.

ट्रम्प यांनी इराणवर अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला. तथापि, इराणने हे आरोप सातत्याने नाकारले आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर, इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकेच्या धमक्या धोरणात्मक अडचणी दर्शवतात, त्यांची ताकद नाही.

दोन्ही देशांमधील तीव्र शाब्दिक चकमकी असूनही, राजनैतिक चर्चा सुरू आहेत. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की, मंगळवारी अमेरिका आणि इराण यांच्यात विस्तृत चर्चा झाली. ही चर्चा संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान झाली, ज्यासाठी दिवसभर दोन्ही बाजूंमध्ये संपर्क ठेवणाऱ्या मध्यस्थांमार्फत ही चर्चा झाली.

इराणच्या लष्करी निवेदनात अमेरिकेच्या निर्बंधांचाही उल्लेख करण्यात आला आहे. इराणने या उपाययोजनांना आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न म्हटले असून, अमेरिकेचा दबाव आणि धमक्या आपली भूमिका बदलू शकत नाहीत, असेही म्हटले आहे.

Comments are closed.