आता अमेरिकेतच इराणची ‘फुटबॉल युद्ध’ तयारी! इराणचा ‘वर्ल्ड कप जिहाद’; अमेरिकेत दोन आठवडे आधी तळ ठोकणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिकेमधील युद्धाच्या धुमसत्या पार्श्वभूमीवर आता वर्ल्ड कप फुटबॉललाही संघर्षाची किनार लाभली आहे. राजकीय तणाव, सुरक्षा चिंता आणि अमेरिकेविरोधातील संताप यांच्या ज्वालांमध्ये इराणचा फुटबॉल संघ आगामी फिफा विश्वचषकासाठी अक्षरशः युद्धपातळीवर तयारी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. अशा स्फोटक वातावरणात इराणचा संघ विश्वचषक सुरू होण्याच्या तब्बल दोन आठवडे आधी अमेरिकेत दाखल होणार असल्याचे इराणचे मुख्य प्रशिक्षक आमीर घालेनोई यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे इराण अमेरिकेशी सुरू असलेल्या युद्धाप्रमाणे पुढच्या महिन्यात अमेरिकेत सुरू होणाऱ्या फुटबॉलयुद्धातही मागे हटणार नसल्याचे दिसत आहे.

मेक्सिकोत खेळण्याची मागणी फेटाळल्यानंतर इराण खेळणार

इराणने याआधी त्यांच्या साखळी लढती अमेरिकेऐवजी मेक्सिकोमध्ये आयोजित करण्याची विनंती फिफाकडे केली होती. अमेरिकन भूमीवर खेळण्याबाबतची अस्वस्थता, युद्धजन्य वातावरण आणि सुरक्षेचे प्रश्न यामागे होते. मात्र फिफाने ती मागणी अमान्य केल्याने आता इराणला अमेरिकेतच उतरावे लागणार आहे. त्यातच दोन्ही देशांतील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने या स्पर्धेकडे केवळ फुटबॉल स्पर्धा म्हणून नव्हे, तर प्रतिष्ठेच्या आणि मानसिक लढाईच्या रणांगणाप्रमाणे पाहिले जात आहे.

आधी तुर्की, नंतर अमेरिका

घालेनोई यांनी स्पष्ट केले की, संघाला अमेरिकेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि सर्वोत्तम तयारीसाठी आधीच पोहोचणे आवश्यक आहे. इराणला अजून दोन ते तीन दर्जेदार सराव सामने खेळायचे आहेत. त्यासाठी 16 मे रोजी संघ तुर्पिये येथे रवाना होणार असून तिथे दोन आठवडय़ांचे विशेष प्रशिक्षण शिबीर पार पडणार आहे. त्यानंतर इराणी संघ थेट अमेरिकेत दाखल होईल. या निर्णयातून इराणचा निर्धार आणि वर्ल्ड कपसाठीची त्यांची आक्रमक मानसिकता स्पष्ट दिसून येते.

प्रतिस्पर्ध्याच्या घरातच दिले आव्हान

इराण फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मेहदी ताज यांनीही ‘विश्वचषकात सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत,’ असे सांगत परिस्थिती किती संवेदनशील आहे, याचे संकेत दिले. पण दुसरीकडे इराणमध्ये मात्र वेगळीच भावना उसळली आहे. अमेरिकेच्या भूमीवर जाऊन खेळणे म्हणजे केवळ सामना नसून ‘प्रतिस्पर्ध्याच्या घरात घुसून दिलेले आव्हान’ अशी मानसिकता अनेक इराणी चाहत्यांमध्ये तयार होताना दिसतेय.

Comments are closed.