इराणचा बेस कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला, वर्ल्ड कपपूर्वी फिफाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

या वर्षी होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकासाठी इराणच्या संघाच्या ट्रेनिंग बेसबाबत ‘फिफा’ने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अमेरिकेऐवजी मेक्सिकोमध्ये बेस कॅम्प उभारण्याच्या इराणच्या मागणीला मंजुरी दिली आहे. प्रवासातील अडचणी, व्हिसा प्रक्रिया आणि अमेरिका-इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

इराण फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मेहदी ताज यांनी या निर्णयाची माहिती दिली. इस्तंबूल येथे फिफा आणि स्पर्धा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर तसेच ‘फिफा’च्या वरिष्ठ प्रतिनिधींशी झालेल्या ऑनलाईन चर्चेनंतर इराणची मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महासंघाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मेहदी ताज म्हणाले, ‘विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या बेस कॅम्पला ‘फिफा’ची मंजुरी आवश्यक असते. इस्तंबूलमधील चर्चेनंतर आणि तेहरानमध्ये ‘फिफा’च्या महासचिवांसोबत झालेल्या वेबिनार बैठकीनंतर अमेरिकेतील बेस बदलून मेक्सिकोमध्ये हलवण्याच्या आमच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. संघ इराण एअरच्या उड्डाणांद्वारे मेक्सिकोला सहज प्रवास करू शकेल.’

इराणी अधिकाऱ्यांच्या मते, या बदलामुळे अमेरिकेत प्रवेश आणि अंतर्गत प्रवासाशी संबंधित अनेक प्रशासकीय अडचणी कमी होतील. टिजुआना येथे बेस कॅम्प उभारल्यास खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ होईल, तसेच प्रवासातही अधिक लवचिकता मिळेल.

तरी इराणचे समोर अमेरिकेतच!

बेस कॅम्प मेक्सिकोमध्ये हलवला असला तरी इराणचे ग्रुप ‘जी’मधील सर्व सामने अमेरिकेतच होणार आहेत. इराण 15 जून रोजी सोफी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर सहा दिवसांनी त्याच मैदानावर बेल्जियमशी सामना रंगणार आहे. गट फेरीतील अखेरचा सामना 26 जून रोजी ल्यूमेन फिल्डवर इजिप्तविरुद्ध होणार आहे.

Comments are closed.