IREvsIND: अभिषेक शर्माचे अर्धशतक रेकॉर्ड बूकमधून गायब, सामन्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार बदलली धावसंख्या

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी२० मालिका खेळली जाणार असून त्यामधील पहिला सामना शुक्रवारी (२६ जून) खेळला गेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने उत्तम फलंदाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ५० धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याच्या नावावर एक विक्रम नोदवला गेला, मात्र सामना संपल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला आणि अधिकृत नोंदीमध्ये त्याची धावसंख्या ५० वरून ४९ झाली. अशाप्रकारे त्याचे अर्धशतक विक्रमांच्या यादीतून नाहीसे झाले.

बेलफास्टमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत यजमान संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यांनी २० षटकांत ९ विकेट्स गमावत १८२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारताची सुरूवात अभिषेककडून चांगली झाली. त्याने केवळ १९ चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २० चेंडूंच्या आत ५ अर्धशतके करणारा पहिलाच भारतीय ठरला होता, मात्र सामन्यानंतर पंचांनी त्याच्या खेळीतून एक धाव कमी केली.

झाले असे की, भारताच्या डावाच्या दुसऱ्या षटकात अभिषेकने गोलंदाज जय मुंद्राच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेतल. मैदानी पंचांनी सुरूवातीला ती धाव दिली, मात्र नंतर व्हिडिओमध्ये असे दिसून आले की तो चेंडू अभिषेकच्या थाय पॅडला लागून फाइन लेगच्या दिशेने गेला. त्यामुळे ती धाव फलंदाजाच्या खात्यात जमा होण्याऐवजी त्याला लेग बाय घोषित केले. या बदलामुळे अभिषेकची एक धाव कमी झाली आणि त्याचे अर्धशतक झाले नाही. भारताची धावसंख्या मात्र तशीच राहिली, त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही.

या सामन्यात अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला वेगवान सुरूवात मिळाली होती, मात्र बाकी फलंदाजांनी निराशा केली. ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्या आणि भारताचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १४८ धावसंख्येवर बाद झाला. हा सामना आयर्लंडने ३४ धावांनी जिंकला आणि भारताविरुद्ध कोणत्याही क्रिकेटप्रकारातील आपला पहिला विजय नोंदवला.

आज (२८ जून) दोन्ही संघांमध्ये दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा विजयाचा प्रयत्न असून मालिका बरोबरीत राखण्याचाही प्रयत्न असेल.

Comments are closed.