बिस्लेरीचे पाणी सुरक्षित की असुरक्षित?

सरकारी संस्था, कंपनीकडून परस्परविरोधी विधाने

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिसलेरी या विख्यात कंपनीचे बाटलीबंद जल पिण्यासाठी असुरक्षित आहे, असे प्रमाणपत्र ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ किंवा एफएसएसएआयने दिल्यानंतर कंपनीने आपले पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रतिपादन केले आहे. प्राधिकरणाचा जो अहवाल सध्या चर्चेत आहे, तो 14 महिन्यांपूर्वीच्या एका पाणीबॅचसंबंधी आहे. हे पाणी कंपनीच्या गोवा येथील उत्पादन केंद्रात सप्टेंबर 2025 मध्ये उत्पादित करण्यात आले होते. त्या पाण्यासंबंधी प्राधिकरणाने आक्षेप घेतला होता. तथापि, अद्याप त्यासंबंधीची नोटीस कंपनीला प्राप्त व्हायची आहे. कंपनीच्या इतर 142 उत्पादन केंद्रांविषयी काहीही आक्षेप नाही. कंपनी पेयजलाचे उत्पादन 10 भिन्न भिन्न प्रक्रियांच्या माध्यमातून करते, असे स्पष्ट केले गेले आहे.

प्राधिकरणाचा अहवाल काही प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झाला आहे, याची प्राधिकारणाला महिती आहे. प्राधिकरणाने कंपनीला नोटीस पाठविली आहे, अशीही माहिती प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आली आहे. ही नोटीस 14 महिन्यांपूर्वी उत्पादित करण्यात आलेल्या एका बॅचसंदर्भात आहे. 30 सप्टेंबर 2025 या दिवशी प्राधिकरणाने या बॅचचे सहा नमुने परीक्षणासाठी घेतले. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित 10 मायक्रोग्रॅम्स प्रतिलीटरच्या स्थानी 12 मायक्रोग्रॅम्स प्रतिलीटर इतके आढळल्याची माहिती प्राधिकरणाने दिली ब्रोमेट हा एक रासायनिक पदार्थ असून तो शरीरासाठी घातक असतो, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

कंपनीकडून अपील

प्राधिकरणाने या बॅचमधील पाण्याचा अहवाल सादर केल्यानंतर कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात उच्चाधिकार प्राधिकरणाकडे अपील केले. त्यानंतर प्राधिकरणाने पेयजलाचे नमुने उच्चाधिकार प्राधिकरणाकडे पाठवून दिले आहेत. उच्चाधिकार प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत जे परीक्षण करण्यात आले, त्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित निकषाच्या आतच असल्याचे आढळून आले आहे. तथापि, पॉलिन्यूक्लिअर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक असल्याचे या परीक्षणात आढळून आले. हे हायड्रोकार्बन्स विषारी असतात. या दोन्ही निष्कर्षांमुळे बिसलेरीच्या पेयजलाविषयी शंका निर्माण झाली असल्याने कंपनीने या दोन्ही प्रकरणांमधील तिची बाजू स्पष्ट करणारे वक्तव्य दिले आहे.

दोन कंपन्यांशी स्पर्धा

बाटलीबंद पेयजल विक्रीच्या क्षेत्रात बिसलेरी कंपनीची पेप्सीकोचे अॅक्वाफिना आणि कोकाकोलाचे किन्ले यांच्याशी स्पर्धा आहे. भारतात बाटलीबंद पेयजलाची बाजारपेठ साधारणत: 8 अब्ज डॉलर्स किंवा साधारणत: 75 हजार कोटी रुपयांची आहे. या स्पर्धेत या तीन मुख्य कंपन्या तर आहेतच. तसेच अनेक स्थानिक छोट्या कंपन्याही आहेत. ही बाजारपेठ प्रत्येक वर्षी साधारणत: 7 ते 8 टक्क्यांनी वाढताना दिसून येते. त्यामुळे दिवसेंदिवस ही स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.