पंजाबमध्ये अकाली दल (पुनरसुरजीत) आणि बसपा एकत्र येणार आहेत
अमृतसर: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येत आहे. शिरोमणी अकाली दल (पुनर सुरजीत) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) यांच्यात निवडणूकपूर्व आघाडी होण्याची शक्मयता आहे. या आघाडीसंदर्भातील चर्चा जवळपास पूर्ण झाली असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात रविवारी संध्याकाळी फरीदकोट येथे अकाली दल (पुनर सुरजीत)चे अध्यक्ष ज्ञानी हरप्रीत सिंह आणि बसपचे ज्येष्ठ नेते अवतार सिंह करीमपुरी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अकाली दल (पुनर सुरजीत)चे फरीदकोटमधील नेते अमनिंदर सिंह बन्नी यांनी या बैठकीला दुजोरा दिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत जवळपास सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले. या संभाव्य आघाडीमुळे पंजाबच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी बसपा आणि अकाली दल ‘वारिस पंजाब दे“ यांच्यातही आघाडीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता अकाली दल (वारिस पंजाब दे), अकाली दल (पुनर सुरजीत) आणि बहुजन समाज पक्ष हे तीन पक्ष एकत्र येण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.
पंजाबच्या राजकारणात नव्या आघाडीची चर्चा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संभाव्य आघाडीकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे. मात्र, तिन्ही पक्षांच्या आघाडीबाबत अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. जागावाटप आणि निवडणूक रणनीतीबाबतही पुढील काळात चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.