सामाजिक न्यायमंत्री शिरसाटांच्या वक्तव्याची चौकशी करा; कुणाचे राम नाम सत्य होणार होते? आमदार कैलास पाटील यांची मागणी

सत्ता मिळवण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकत होते. हे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विधानातून बाहेर आले आहे. कुणाला थांबवले? कोण काय करणार होते? कुणाचे राम नाम सत्य होणार होते? असे सवाल करत संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

शिवसेनेत पाडलेली फूट ही सत्ता मिळवण्यासाठी होती हे संजय शिरसाट यांच्या विधानातून दिसत आहे. सुरतवरून परत येत असताना मला जाणीव होती की हे लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, त्याची तयारी मी ठेवली होती. राजकारणात आजपर्यंत कोणी असा थर गाठला नसेल असे ते करायला तयार होते. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर कुठे गेला आहे हे जनतेसमोर आले पाहिजे, असे कैलास पाटील म्हणाले.

मंत्री शिरसाट काय म्हणाले?

एका पॉडकास्टमध्ये संजय शिरसाट म्हणाले, शिवसेना पक्षफुटीवेळी घडलेली घटना ही एक वेबसीरिजसारखी आहे. पाऊस पडत होता. एक आमदार परत जाण्यासाठी धडपडत होता, पुढचे काही सांगत नाही, मात्र त्या दिवशी त्याचे राम नाम सत्य झाले असते. आम्ही थांबवले म्हणून त्यांना परत जाता आले, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.

मंत्र्यांमध्ये असे बोलण्याची हिंमत कुठून येते

राज्याचे मंत्री उघडपणे असे बोलत असतील तर त्यांच्यात हिंमत येते कुठून? सत्तेच्या जिवावर आपले काहीही होऊ शकत नाही, असे यांना वाटतेय, मुख्यमंत्री फडणवीस आता आपल्या सत्तेतील मंत्र्यांची चौकशी करणार का? असा सवाल कैलास पाटील यांनी केला.

कुणाचा दबाव होता? कसला दबाव होता? त्यावेळी काय झाले? काय काय गोष्टी सत्तांतरासाठी केल्या, या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. या लोकांचे खरे रूप बाहेर येईल.

Comments are closed.