गोध्रा प्रकरणातील एका आरोपीच्या शिक्षेला स्थगिती दिली

गंभीर वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी 2002 च्या गोध्रा रेल्वे अग्निकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या इरफान सिराज पाडा याला मोठा दिलासा दिला. त्याच्या गंभीर आजारामुळे आणि दीर्घकाळ तुरुंगवास भोगत असल्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर केला. इरफान याने 17 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने सोमवारी शिक्षा निलंबनासंबंधीचा हा आदेश दिला. या न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ दोषसिद्धी रद्द करणे किंवा इरफानची निर्दोष मुक्तता असा होत नाही.

इरफानने जामिनाचा अर्ज प्रामुख्याने वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान इरफान याने आपल्याला गंभीर हृदयरोग असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच गुजरात सरकारने त्याच्या वैद्यकीय स्थितीशी संबंधित तथ्ये नाकारली नाहीत. तथापि, राज्याने प्रकरणाचे गांभीर्य देखील नमूद केले. या परिस्थितीचा विचार करून खंडपीठाने त्याची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्या प्रलंबित अपिलावरील अंतिम निर्णयापर्यंत हा दिलासा लागू राहील.

2025 मध्येही इरफानला दिलासा

इरफान याला 2025 मध्ये अंतरिम पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी, राज्य सरकारला त्याच्या लवकर सुटकेच्या विनंतीवर विचार करण्यास सांगितले होते. आता, सर्वोच्च न्यायालयाने त्याची गंभीर हृदयरोग स्थिती आणि दीर्घकाळ तुरुंगवासाच्या कारणास्तव त्याची शिक्षा स्थगित करून त्याला जामीन मंजूर केला आहे.

गोध्रा घटनेची पार्श्वभूमी

27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातच्या गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 डब्याला आग लागली. या घटनेत 58 लोकांचा मृत्यू झाला. त्या ट्रेनमध्ये अयोध्येहून परतणारे कारसेवक होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या. मार्च 2011 मध्ये एका विशेष न्यायालयाने या प्रकरणात 31 जणांना दोषी ठरवले. यापैकी 11 जणांना फाशीची आणि 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने 63 आरोपींना निर्दोषही ठरवले. त्यानंतर, 2017 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने 11 दोषींच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर केले. उर्वरित 20 जणांच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली. दोषींची अपीले 2018 पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

Comments are closed.