अशोक खरातला महिला आयोग पाठीशी घालत आहे का? विजय कुंभारांचा सवाल, देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवत
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला महिला आयोग पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू होता आणि वर्षभरापूर्वी या सगळ्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती त्यावेळी त्यांनी अशोक खरात यांच्यावर नाही तर बातमी छापणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्या संदर्भातलं पत्र देखील आहे असेही विजय कुंभार (Vijay Kumbhar) म्हणाले आहेत. चाकणकर यांनी खरातवर कारवाई केली नाही. याचाच अर्थ हे सगळं घडवण्याचा प्रकार सुरू होता का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Ashok Kharat)
विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी खरात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये विजय कुंभार यांनी म्हटलंय की, अशोक खरात प्रकरणी गैरप्रकार, प्रभावाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग व तक्रारी दडपल्याबाबत चौकशी करण्याबाबत व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्यात यावं.
विजय कुंभार यांचं पत्र
नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याला महिलांवर अत्याचार प्रकरणी अटक झाल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. त्याच्या विविध राजकीय नेते, मंत्री, आमदार व खासदारांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित काही गंभीर बाबी समोर येत असून त्या शासन व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का देणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे हे मंदिर त्यानेच स्थापन केले आहे आणि त्याचा जमिनी देवाण घेवाणीचा व्यवसाय आहे.
अशोक खरात रुपाली चाकणकर यांच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत होता
मागील वर्षी या प्रकरणासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित वर्तमान पत्राला ४ एप्रिल २०२५ रोजी पाठवलेल्या नोटिशीमध्ये खरात याने “महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी देखील सदर बातमीची दखल घेतली आहे. महिला आयोग यांनी देखील तुम्हाला पत्रव्यवहार केला असता तुम्ही त्यांना सदर खोट्या बातमी बद्दल कोणतेही स्पष्टीकरण किंवा समर्थन देण्यास यशस्वी झाला आहात. परिणामी, महिला आयोगाने पोलीस ठाण्याला तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत” असा उल्लेख केला आहे आणि ही बाब रुपाली चाकणकर यांना सदर प्रकरणाबद्दल फार आधीपासून माहिती होती हे आणि त्या महिलांच्या तक्रारींबाबत संवेदनशील नाहीत हे सिद्ध करते. यातूनच अशोक खरात हा रुपाली चाकणकर यांच्याशी असलेल्या आपल्या ओळखीचा गैरफायदा घेत होता हेही दिसून येते.
व्हिडिओंचा वापर त्याने ब्लॅकमेलिंगसाठी केला असण्याची दाट शक्यता
यासंदर्भात जे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये फिरत येत आहेत त्यातून हा खरात किती विकृत आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे या माणसाने आपल्या विकृतीचे चित्रीकरण केले आहे. म्हणजे या व्हिडिओंचा वापर त्याने ब्लॅकमेलिंगसाठी केला असण्याची दाट शक्यता आहे. याहून कहर म्हणजे सदर चित्रीकरण सुरू असताना पार्श्वभूमीवर आरती किंवा स्तोत्रासारखे काहीतरी ऐकू येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अशोक खरात याने नाशिक जिल्ह्यातील मीरपूर येथे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या असून त्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकामासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे कमाल शेत जमीनधारणा कायद्याचे उल्लंघन त्याने केले असल्याचे दिसून येत आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दीड किलोमीटरचा रस्ता करण्यात आला आहे, तो कोणी बांधला याचीही चौकशी करणे आवश्यक आहे.
याशिवाय, खरात याच्या शिवानिका या खाजगी ट्रस्टला धरणातून मोठ्या प्रमाणात (Bulk Water Entitlement) पाणी उचलण्याची परवानगी मंत्रालयातून देण्यात आली आहे. तो मंत्रालयापर्यंत कसा पोहोचला, ही परवानगी कोणत्या निकषांवर व कोणाच्या आदेशाने देण्यात आली, यासंदर्भात कोणी पाठपुरावा केला आणि खाजगी ट्रस्टला अशी परवानगी कशी देण्यात आली? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
बंद दाराआड महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप
अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे वारंवार दिसून येते. परंतु जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले व्यक्तीच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. वर्षानुवर्षे विश्वासार्हतेचा आभास निर्माण करून, ज्योतिष व धार्मिक आडाख्यांच्या माध्यमातून उच्चभ्रू समाजात प्रवेश मिळवत, बंद दाराआड महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. सत्तेशी असलेली जवळीक आणि प्रभावामुळे अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास निर्माण होतो व यंत्रणा निष्क्रिय बनून अशा कृत्यांना अप्रत्यक्षपणे खतपाणी मिळते.
अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांचे मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. मात्र, जेव्हा महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेच्या नेतृत्वाकडूनच अशा अंधश्रद्धेला बळी पडल्याचे चित्र समोर येते, तेव्हा हा विरोधाभास अधिक गंभीर ठरतो. विशेष बाब म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांशी अयोग्य वर्तन व शोषण केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोगाकडे आलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई न केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच, पोलीस व संबंधितांना आयोगाकडून कडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची गोपनीय माहिती संबंधित आरोपीला कशी कळली? त्यामुळे यात अंतर्गत संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुमारे एक-दीड वर्षापूर्वी खरात याच्याबाबत आलेल्या तक्रारींकडे रुपाली चाकणकर यांनी गांभीर्याने लक्ष दिले असते तर कदाचित आणखी काही महिलांवरचा अत्याचार टळला असता. याशिवाय, चाकणकर यांनी खरात याच्या चुकीच्या कृत्यांना सार्वजनिकरीत्या पाठिंबा दिल्याचे व त्याचा गौरव केल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळाले आहे.
सदर प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता, अशोक खरात आणि त्याच्या संस्थेने सदर व्हिडिओंचा वापर कुठे कुठे केला याची तसेच मिळालेल्या शासकीय लाभांची, विशेषतः मोठ्या प्रमाणातील पाणी वाटप व जमीन व्यवहारांची, सखोल चौकशी करून त्यामागील संपूर्ण यंत्रणा उघड करण्यात यावी. या सर्व प्रकरणात सौ. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्या आपल्या पदाचा योग्य वापर करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे होणारे मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषण रोखण्यासाठी शासनाने राज्यभर विशेष मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. सदर प्रकरणातील सर्व दोषींवर कोणतीही दया न दाखवता कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रवृत्तींना आळा बसेल.
आणखी वाचा
Comments are closed.