रात्रीचं दचकून उठते, समोर रायफलवाला, दिसतो, पुण्याचं जगदाळे कुटुंबीय अजूनही धक्क्यात
मुंबई : पहलगाम हल्ल्यामध्ये एकूण 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जण होते, या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या मृतांमधील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या कन्या असावरी जगदाळे (Asawari Jagdale) यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी असावरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सरकारचे आभार मानले आहेत, त्याचबरोबर त्यांनी आम्ही दहशतावद सोसला आहे, अजूनही तो प्रसंग डोळ्यासमोर आहे, तो कधीही विसरता येणार नाही, त्यामुळे राजकीय नेत्यांनी किंवा कोणीही वक्तव्ये करून आमच्या भावनांशी खेळू नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
आम्ही त्यातून बाहेर पडलेलो नाही…
संतोष जगदाळे यांच्या पत्नीने एबीपी माझाशी बोलताना सांगिले की, मी अजूनही त्याच धक्क्यात आहे. डोळे जरी बंद केले तरी मला तो रायफलवाला माणूसच दिसतो आणि मी त्या दिवसापासून झोपलेलीच नाही. या गेल्या आठ दिवसांमध्ये लोक आम्हाला खूप सपोर्ट करत आहेत. आम्हाला येऊन भेटत आहेत. आठ दिवस आम्ही खूप भयानकतेत घालवलेले आहेत. काल रविवार होता किंवा सोमवार होता याची आम्हाला जाणीव नाही. आम्ही अजूनही त्या फायरिंग वाल्याच ठिकाणी आहे. आम्ही त्यातून बाहेर पडलेलो नाही. आम्हाला तेच तेच रिपीट रिपीट होत चाललं आहे. माझ्यासाठी तो मोठा धक्का आहे. मी त्यातून सावरूच शकत नाही. केवळ मला असावरीसाठी आश्वासन मिळाली आहेत. कमीत कमी सरकार माझ्या मुलीचं काहीतरी चांगलं करेल या आशेवर मी आहे. कारण आमचा आत्ता जो लॉस झाला आहे, तो कोणीच भरून काढू शकत नाही. तो लॉस माझ्या शब्दात देखील व्यक्त करू शकत नाही, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
रात्री अडीच वाजता मी दचकून उठलेय…
पुढे त्या म्हणाल्या, मला आजही भयंकर भीती वाटते. रात्री अडीच वाजता मी दचकून उठले. मला असं वाटलं समोर कोणीतरी रायफल घेऊन फिरत आहे. मी घाबरून दचकून इकडे तिकडे पाहिलं. आता देखील मला ते सांगताना खूप भीती वाटते आहे. जरा कुठे काही आवाज झाला तरी मला भीती वाटते. ते आपल्या आजूबाजूलाच आहे तशी भीती वाटायला लागते. ती आमच्या मनाची स्थिती आहे. माझी एक विनंती आहे, याचा राजकीय विषय करू नका आणि आमच्या भावनांची खेळू नका असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
ते पाहिलेलं अनुभवलेलं ते फार भयानक…
आम्ही या भयानक गोष्टीचा अनुभव घेतला आहे. हल्लेखोर काय बोलले आहेत ते सर्वांनी सांगितलं आहे. त्या ठिकाणी आमचं कसं बलिदान झालं आहे हे रंगवून सगळं या राजकारण्यांनी त्याच्याशी खेळू नये. आम्ही तो अनुभव घेतला आहे. आमचा माणूस आमच्याच समोर मारला गेला आहे आणि बोलून मारला आहे. त्यांची काही जी वाक्य आहे. त्यांची जी स्टेटमेंट आहेत. ते आम्ही सगळ्यांना सांगून झालंय. हे सगळं त्यांनी बोलून दाखवलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मारलं आहे. ते निवांत मारायला आलेले होते. त्यामुळे जो तो विचार आमच्या मनामध्ये आहे, ते पाहिलेलं अनुभवलेलं ते फार भयानक आहे. तो दहशतवाद आम्ही जगला आहे. दहशतवाद हा जो शब्द आहे, तो आम्ही सोसला आहे. तिथे तो दहशतवाद काय असतो, तो शब्द आम्ही अनुभवला आहे. त्यांनी जी द्वेषाने बोललेली वाक्य आहेत ते आम्ही ऐकले आहेत. आम्ही ह्यांना हात जोडले आहेत. ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर येत राहतं. माझ्या डोळ्यासमोर अजून माझे मिस्टर तो गोळ्या झाडणारा हल्लेखोर आणि माझे दीर खाली पडलेले आहेत. ते त्यांनी कशा गोळ्या घातल्या ते समोर दिसतं. गोळ्या घातल्यानंतर त्यांचा मेंदू कसा बाहेर आला ते माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाही. मला आत्ताही भीती वाटते. ते या बाजूने येतील की त्या बाजूने येतील अशी भयानकता माझ्या मनामध्ये अजून आहे आणि मी हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही. माझी फक्त सगळ्यांना विनंती आहे आमच्या भावनांशी खेळू नका. आम्ही अतिशय भयानक परिस्थिती तिथं जगलो आहोत. त्यामुळे सगळ्या राजकारणांना मी सांगते माणुसकी म्हणून तरी आमच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्याशी खेळू नका असा आवाहन देखील जगदाळेंच्या पत्नीने केलं आहे.
स्टेटमेंट करणं फार सोपं आहे…
आम्ही आता कोणत्या मानसिक स्थिती मधून जात आहोत त्याचा त्यांनी विचार करावा. एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी याकडे पहावं आणि विचार करावा. आज आम्ही त्या ठिकाणी काय भोगलं आहे ते सांगू शकत नाही. स्टेटमेंट करणं फार सोपं आहे, ते असं बोलले का? हे तसं बोलले का? असं केलं का? तसं केलं का? त्याप्रसंगी लहान लहान मुलं सुद्धा तिथे होती. त्यांनी देखील हेच स्टेटमेंट दिलं आहे. तुम्ही ते खोटं पाडू शकत नाही. ती लहान मुलं आहेत. त्यांनी ते पाहिलं. त्यांनी देखील ते सांगितलं. सगळ्यांनी तेच सांगितलं. एक माणूस तुम्हाला वाटतं खोटं बोलू शकतो. पण, सगळे खोटं बोलू शकत नाहीत. तर मग तुम्ही अशी स्टेटमेंट का देता आमच्या मनाशी तुम्ही खेळत आहात. तुम्ही आपल्या देशातली, आपल्या राज्यातील लोक आहात. आम्ही तुम्हाला आपलं मानतो आणि तुम्ही अशी वक्तव्य करून आमच्या मनाशी आणि भावनेशी खेळू नका असेही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.