अजित पवार आणि राज ठाकरे एकत्र! भाजप आणि शिवसेनेला देणार टक्कर, जालन्यात राजकीय घडामोडींना वेग

जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जालन्यात युती झाली आहे. हे दोन्ही पक्ष जालना महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली.

या युतीअंतर्गत जालना महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे 50 तर मनसेचे 6 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.दुसरीकडे, महायुतीतील भाजप आणि शिवसेना जालन्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. महायुतीतील दोन्ही पक्षांनी आम्हाला नगण्य समजत सोबत घ्यायला नकार दिला, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी केला आहे. याचवेळी जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादीचाच होणार, असा ठाम दावाही त्यांनी केला आहे. या घडामोडींमुळे जालना महानगरपालिका निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

जालन्यात भाजप-शिवसेना यांची युतीही तुटली

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवाी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी महायुती एकत्र लढत आहे तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवल्या जात आहे. अशातच जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. याबाबत माहिती भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याची माहिती भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. राज्याच्या धोरणांच्या सूत्रामध्ये ही युती न बसल्यामुळे तुटल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. जालना महानगर पालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे लोणीकर म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. पुणेमुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.