पहिलीच भेट ठरली शेवटची, वाहन अपघातात तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) येथे लक्झरी बसने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. दीपेन जैन असे मृताचे नाव आहे, तर एक तरुणीदेखील जखमी झाली आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार तरुणी ही नालासोपारा येथे राहते. सहा महिन्यांपूर्वी तिची एका अॅपच्या माध्यमातून दीपेनसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्याने एकमेकांना भेटून लग्नाची तारीख निश्चित करण्याचे ठरले. ठरल्यानुसार रविवारी दुपारी दीपेन हा जखमी तरुणीला अंधेरी रेल्वे स्थानक येथे भेटला. त्यानंतर ते मोटरसायकलवरून जुहू येथे गेले. तेथे काही वेळ गप्पा मारल्यानंतर ते आरे कॉलनी येथून अंधेरीच्या दिशेने निघाले. रात्री पावणे आठच्या सुमारास ते मोटरसायकलने जेव्हीएलआर ब्रीज येथून जात होते.

तेव्हा मागील बाजूने आलेल्या लक्झरी बसने मोटरसायकलला धडक दिली. त्या धडकेत ते दोघे गंभीर जखमी झाले. जखमी तरुणी ही काही अंतर फरफटत गेली, तर बसचे चालक दीपेनच्या डोक्यावरून गेल्याने तो जखमी झाला. अपघातानंतर बसचालक हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्थानिक रहिवाशांनी त्याला पकडले. या घटनेची माहिती समजताच जोगेश्वरी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दीपेनला मृत घोषित केले. पोलिसांनी बसचालक प्रसाद जाधवविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी जाधवला अटक केली.

Comments are closed.