टिटवाळा, मुरबाड येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, हप्तेखोर वाहतूक, परिवहन अधिकारी मात्र मोकाट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आठवड्यापूर्वी कल्याण – मुरबाड महामार्गावरील रायते पुलावरील अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे अपघातप्रकरणी जबाबदार धरून कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांची बदली ठाणे कंट्रोल येथे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची बदली शहापूर ग्रामीणला करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे रस्ते अपघाताला जबाबदार असणारे हप्तेखोर आरटीओ, वाहतूक अधिकारी मात्र मोकाट आहेत.

टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे आजारी असल्याने त्या जागेवर मुरबाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांना प्रभारी चार्ज दिला होता. याचदरम्यान १३ एप्रिल रोजी कल्याण मुरबाड महामार्गावरील रायते पुलावर प्रवासी जीपचा भीषण अपघात होऊन ११ निष्पाप प्रवाशांचा बळी गेला. मुळात रस्ते कामाचा ठेकेदार व हप्तेखोर आरटीओ विभागाच्या बेफिकीरीमुळे हा अपघात झाला.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा बळी

ओव्हरसीट, चुकीचे ओव्हरटेक, अमर्याद वेग, रस्त्यावरील अडथळे या सर्व कारणांना तसे पाहिले तर वाहतूक विभाग, आरटीओ, नॅशनल हायवे ऑथोरिटी जबाबदार आहे. असे असताना केवळ अपघात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. केवळ ठेकेदार आणि आरटीओ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा बळी दिल्याची चर्चा तालुक्यात व्यक्त होत आहे.

Comments are closed.