चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं; पडक्या घराजवळ मृतदेह आढळला, लातूरमधील हादरवणारी घटना

लातूर क्राईम न्यूज: लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत सहा वर्षीय देवांश मंगेश स्वामी याचा खून कुटुंबातीलच चुलतीने केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latur Crime News)

स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद पंचांच्या उपस्थितीत मिटवण्याचे प्रयत्नही झाले होते. मात्र, या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. (Latur Crime News)

नेमकं काय घडलं? (Latur Crime News)

19 एप्रिल रोजी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपीने गळा दाबून खून केल्याचे समोर आले. खून केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात आरोपीने स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनावही रचला होता. मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्या मुलाला सुखरूप शोधून काढले आणि याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.

17 तासांत गुन्ह्याचा उलगडा, आरोपी अटकेत- (Latur Crime News)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुधाकर बावकर यांनी चाकूर येथे ठाण मांडून तपास केला. पोलीस अधीक्षकांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली होती. अवघ्या 17 तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भंडे करत असून, या घटनेमुळे नात्यातील व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने संतप्त चर्चा होत आहे.

भंडाऱ्याच्या मोहदुरा गावातही हादरवणारी घटना- (Bhandara Crime News)

भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवरचं एका नराधमान अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या मोहदुरा गावात घडला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीची मुलगी आणि पीडिता या दोघीही एकाच वर्गात शिकतात. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच आरोपीच्या घरी थांबली असताना, आरोपीनं तिला दुचाकीवर फिरवून आणण्याच्या बहाण्यानं बाहेर नेत एका निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेच्या धक्क्यातून आणि मानसिक त्रासातून पीडितेनं विषप्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी आरोपी सोमा मेश्राम याला अटक केली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाची घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन

आणखी वाचा

Comments are closed.