कर्जतच्या किकवी-चिल्हार नदीवरील बंधाऱ्याला धो धो गळती; रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एकीकडे सर्वत्र दुष्काळाचे सावट व पाणी टंचाई निर्माण झाली असतानाच कर्जतच्या किकवी-चिल्हार नदीवरील केटी बंधाऱ्याला धो धो गळती लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाणी अडवण्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट्स निकृष्ट दर्जाच्या असून त्याला भगदाडे पडली आहेत. त्यामुळे रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. हा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. केटी बंधाऱ्याला लागलेल्या गळतीमुळे पाणी टंचाईचे संकट आणखी वाढणार असून पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणाही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

कर्जतपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कशेळे गावाजवळ किकवी-चिल्हार नदी असून त्यातील पाण्यावर आजूबाजूच्या गावांमधील शेतकरी तसेच ग्रामस्थ अवलंबून आहेत. याच बंधाऱ्यातून शेतीलाही पाणीपुरवठा केला जातो. विशेषतः उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या वेळी या बंधाऱ्यातील पाण्याचा मोठा उपयोग होतो. पाटबंधारे विभागाने पाणी अडवण्यासाठी लोखंडी प्लेट्स लावल्या आहेत. या प्लेट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्लेट्स लावूनही गळती होत असल्याचे आढळून आले आहे.

गळती थांबली नाही तर…

रब्बी हंगामातील शेती, भाजीपाला पिके, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि गावांच्या नळपाणी योजनांसाठी याच बंधाऱ्यातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सध्या सुरू असलेली गळती वेळीच थांबवली नाही तर उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन शेतीसह पिण्याच्या पाण्याचेही गंभीर संकट निर्माण होण्याची भीती शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

किकवी-चिल्हार नदीवरील केटी बंधाऱ्यामुळे अडवलेल्या पाण्याचा उपयोग लोभेवाडी, नालधेवाडी, बोरवाडी, किकवी व आजूबाजूच्या गावांना होतो. मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने उन्हाळ्यात या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या आठवड्यात जुन्या लोखंडी प्लेट काढून तेथे नव्या प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. मात्र एका आठवड्यातच गळती सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळेच ही वेळ आल्याचा आरोप लोभेवाडी येथील ग्रामस्थ गणेश केवारी यांनी केला आहे.

Comments are closed.