रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; करुणा मुंडेंचा इशारा
बीड : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी गंभीर आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीका त्यांनी केली. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला नाही तर आपण मंत्रालयाच्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला.
रुपाली चाकणकरांमुळे राज्यातील महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. बलात्कारी अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर दिसतात, त्याच्या संस्थेमध्ये त्या संचालिका आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असं करुणा मुंडे म्हणाल्या. जर सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे.
Karuna Munde On Kangana Ranaut: Kangana Ranautwar Comment
दुसरीकडे, करुणा मुंडे यांनी भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका केली. कंगना रनौत यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला करुणा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, “कंगना रनौत म्हणाल्या की राहुल गांधी टपोरी आहेत, त्यांना पाहिल्यावर महिलांना अस्वस्थ वाटतं. मग तुम्ही त्यांच्याकडे बघताच कशाला? सोनिया गांधींवर कंगनाने शिंतोडे उडवले. पण कंगना किती चरित्रहीन आहे हे गुगलवरचे फोटो पाहून दिसतं. कंगनाचे इंटरनेटवरचे फोटो पाहून अनेक पुरुषांना अस्वस्थ वाटतंय. आगोदर तुम्ही बिकिनीवर फिरत होता, आज तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोलणार का?”
Rupali Chakankar Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे विकृत कारनामे समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांनी पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी केली. दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीका करत त्यांना कोण वाचवतंय, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकरांची पाठराखण केल्याचं दिसतंय. असं असलं तरी राष्ट्रीवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनीही चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली.
अशोक खरात याला महिला आयोग पाठीशी घालत आहे का असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू होता आणि वर्षभरापूर्वी या सगळ्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती, त्यावेळी त्यांनी अशोक खरात यांच्यावर नाही तर बातमी छापणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्या संदर्भातलं पत्र देखील आहे असंही विजय कुंभार म्हणाले. चाकणकर यांनी खरातवर कारवाई केली नाही. याचाच अर्थ हे सगळं घडवण्याचा प्रकार सुरू होता का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.