शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नाही, खालापूरच्या आरोग्य केंद्रात मृतदेह तासन्तास वेटिंगवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ महिन्यांपासून शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करणारा कर्मचारीच उपलब्ध नसल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. या आरोग्य केंद्रातील मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी चौक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला बोलवावे लागत असल्याने मृतदेहांना तासन्तास वेटिंगवर ठेवावे लागत आहे.

आरोग्य विभाग ढिम्म
या समस्येबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. आठ महिने उलटूनही रिक्त पद भरण्यात आले नसल्याने आरोग्य विभागाच्या ढिम्म कार्यपद्धतीबाबत खालापूरवासीयांत संतप्त भावना आहेत.

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाचे काम करणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी चौक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याची मदत घ्यावी लागत आहे. एखाद्या गंभीर घटनेनंतर शवविच्छेदनासाठी कर्मचारी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मृतांच्या नातेवाईकांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
खालापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून तालुक्यातील आरोग्य सेवांचा भार मर्यादित मनुष्यबळावर आहे. अशा परिस्थितीत चौक येथील एक कर्मचारी कुठे कुठे धावणार, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. शवविच्छेदकाचे रिक्त पद तातडीने भरण्याची मागणी खालापूरवासीयांनी केली आहे.

Comments are closed.