बुद्धिबळाच्या जगज्जेतेपदाचा 140 वर्षांचा थरार, 18 जगज्जेते, 25 लाख डॉलरचे पारितोषिक; 64 घरे आणि असंख्य विक्रम
1886 मध्ये सुरू झालेल्या बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदाच्या परंपरेला तब्बल 140 वर्षे पूर्ण होत आहेत. या इतिहासात अवघ्या 18 खेळाडूंनी विश्वविजेतेपदाचा मुकुट आपल्या शिरपेचात खोवला आहे. यंदा हिंदुस्थानचा दोम्माराजू गुकेश आणि उझबेकिस्तानचा जावोखिर सिंदारोव्ह या दोन युवा खेळाडूंमध्ये महासंग्राम रंगणार आहे. यानिमित्ताने बुद्धिबळयुद्धातील काही रंजक आकडेवारी…
पहिला विश्वविजेता – 1886 मध्ये विल्हेल्म स्टेनिट्झने जोहान्स झुकेटॉर्टला पराभूत करून पहिला अधिकृत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला.
अवघे 18 जगज्जेते – 140 वर्षांच्या इतिहासात स्टेनिट्झपासून गुकेशपर्यंत केवळ 18 खेळाडूंनी क्लासिकल विश्वविजेतेपद पटकावले आहे.
27 वर्षांचे अधिराज्य – इमॅन्युएल लास्करने 1894 ते 1921 अशी तब्बल 27 वर्षे विश्वविजेतेपद सांभाळले.
सर्वांत तरुण विश्वविजेता – गुकेशने 18 वर्षे आणि 197 दिवसांच्या वयात डिंग लिरेनला हरवून गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला.
दोन विशीतले दावेदार – गुकेश आणि सिंदारोव्ह दोघेही 20 वर्षांचे आहेत. विश्वविजेतेपदाच्या इतिहासातील ही सर्वात तरुण प्रतिस्पर्ध्यांची लढत ठरणार आहे.
25 लाख डॉलरचे पारितोषिक – यंदाच्या लढतीसाठी 25 लाख अमेरिकन डॉलरची रक्कम ठेवण्यात आली आहे. प्रत्येक निर्णायक विजयासाठी दोन लाख डॉलर मिळणार आहेत.
14 डावांचा महासंग्राम – लढतीत जास्तीत जास्त 14 डाव खेळवले जातील. साडेसात गुण मिळवणारा पहिला खेळाडू विश्वविजेता ठरेल.
40 चालींची अट – काळय़ा सोंगटय़ांची 40 वी चाल पूर्ण होण्यापूर्वी खेळाडूंना परस्पर संमतीने बरोबरी घोषित करता येणार नाही.
वेळेचे कठीण गणित – पहिल्या 40 चालींसाठी प्रत्येकाला 120 मिनिटे, त्यानंतर 30 मिनिटे आणि 41 व्या चालीपासून प्रत्येक चालीला 30 सेकंदांची वाढीव वेळ मिळेल.
48 डावांची लढत – 1984 मध्ये कार्पोव्ह आणि कास्पारोव्ह यांच्यात 48 डाव खेळल्यानंतरही निकाल लागला नाही. अखेर सामना रद्द करण्यात आला.
अवघ्या 10 डावांत निकाल – 2013 मध्ये कार्लसनने आनंदला पराभूत करून अवघ्या 10 डावांत विश्वविजेतेपद पटकावले.
हिंदुस्थानचे दोन जगज्जेते – विश्वनाथन आनंद यांनी 2007, 2008, 2010 आणि 2012 मध्ये विश्वविजेतेपद मिळवले. गुकेशने 2024 मध्ये दुसरा हिंदुस्थानचा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला.
कास्पारोव्हचे सहा मुकुट – गॅरी कास्पारोव्हने 1985 ते 2000 या काळात सहा वेळा विश्वविजेतेपद पटकावले. कार्लसनने 2013 ते 2021 या काळात पाच वेळा हा मान मिळवला.
फिशर-स्पास्कीचा ऐतिहासिक संघर्ष – 1972 मध्ये रेक्याविक येथे झालेली ही लढत शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि सोव्हिएत संघाच्या प्रतिष्ठsची लढाई ठरली.
विश्वचषक वेगळा, विश्वविजेतेपद वेगळे – विश्वचषक जिंकल्याने थेट जगज्जेते होता येत नाही. कँडिडेट्स स्पर्धेत पात्र होऊन ती जिंकणाऱयाला विश्वविजेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते.
उझबेकिस्तानचा पहिला आव्हानवीर – सिंदारोव्ह हा उझबेकिस्तानचा पहिला क्लासिकल विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरणार आहे.
72 रेटिंग गुणांची आघाडी – सिंदारोव्हचे एलो मानांकन 2782, तर गुकेशचे 2710 आहे. मात्र, रेटिंग म्हणजे विजयाची हमी नाही.
स्वित्झर्लंडमध्ये पुनरागमन – 2004 मध्ये ब्रिसागो येथे विश्वविजेतेपदाची लढत झाली होती. आता 2026 मध्ये जिनिव्हात पुन्हा ही प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे.
दर दोन वर्षांनी विश्वविजेतेपद – क्लासिकल विश्वविजेतेपदाची लढत साधारणपणे दर दोन वर्षांनी होते. कँडिडेट्स स्पर्धेतील आठ खेळाडू 14 डाव खेळतात आणि विजेत्याला विश्वविजेतेपदाचे आव्हान देण्याचा अधिकार मिळतो.
Comments are closed.