सिंधू, लक्ष्य सेनची माघार, सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंगळवारपासून सुरू होणाऱया सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत गतविजेत्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचे लक्ष्य सलग तिसऱयांदा विजेतेपद पटकावण्याचे असेल. महिला दुहेरीतील या हिंदुस्थानी जोडीने गेल्या दोन स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवले असून, यंदाही विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे 2 लाख 50 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या या स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.

महिला एकेरीत आठ मानांकित खेळाडूंपैकी पाच हिंदुस्थानी आहेत. फेब्रुवारीमध्ये थायलंड मास्टर्सचे विजेतेपद मिळवणारी देविका सिहाग पहिल्या फेरीत तान्या हेमंतशी भिडणार आहे. तैपेई ओपन विजेती 17 वर्षीय तन्वीचा सामना मलेशियाच्या गोह जिन वेईशी होईल. पाचव्या मानांकित अश्मिता चालिहासमोर युक्रेनच्या पोलिना बुहरोव्हाचे आव्हान असेल. तिसरी मानांकित उन्नती हुड्डा युक्रेनच्या येव्हहेनिया के, तर आठवी मानांकित ईशाराणी बरुआ इंडोनेशियाच्या टी. रमादानी विरयावानशी लढणार आहे.

हाँगकाँग ओपनमध्ये ऑलिम्पिक विजेत्या चेन यू फेईला पराभूत करणारी रक्षिता रामराज पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी भिडणार आहे. अन्य सामन्यांत मानसी सिंह-सुपनिदा केटथाँग, आकर्षी कश्यप-वोंग लिंग चिंग आणि अनुपमा उपाध्याय यांच्यातील लढतींकडे लक्ष असेल. श्रियांशी वालिशेट्टी-अनमोल खरब आणि मालविका बनसोड-तस्नीम मीर यांच्यातही हिंदुस्थानी खेळाडूंचीच लढत रंगणार आहे.

Comments are closed.