खालापूरातील भयंकर दुर्घटना.. कस्तुरी लॉजिस्टिक वेअर हाउसची लोखंडी शेड पत्त्यासारखी कोसळली
माणकिवली गावात बांधकाम सुरू असलेल्या कस्तुरी लॉजिस्टिक वेअर हाउसचा शंभर फुटी उंच शेडचा लोखंडी सांगाडा अक्षरशः पत्त्यासारखा कोसळल्याची घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत लोखंडी शेडवर काम करणारे २५ कामगार अडकून पडले. त्यांना युद्ध पातळीवर बचावकार्य करत तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील अनेक कामगारांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत, डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. उपचार सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून आठजणांची प्रकृती चिंताजनक आहे. या शेडखाली असलेली क्रेन, डंपर, रोलर यांचेही मोठे नुकसान झाले.
खालापूर तालुक्यातील माणकिवली गावाजवळ सुमारे ४० एकर क्षेत्रात कस्तुरी लॉजिस्टिक वेअर हाउसच्या लोखंडी शेडचे काम सुरू आहे. या शेडचे काम पुणे येथील गौरव इंजिनिअरिंग कंपनी करत आहे. या लोखंडी शेडवर २५ कामगार शेडफिटिंगचे काम करत होते. तर शेडखाली ३० ते ४० कामगार होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शंभर फुटांहून उंच असलेली लोखंडी शेड पत्त्यासारखी कोसळली. शेडवर चढलेले कामगार अडकून पडले तर खाली उभे असलेले कामगार वेळीच बाहेर पळाल्याने वाचले.
वेदनांनी तडफड
शंभर फुटी उंच आणि वजनदार शेड अंगावर पडल्याने अनेकांचे हात, पाय फ्रॅक्चर झाले. डोक्यावर आणि अंगावर मोठ्या जखमा झाल्याने रक्त वाहत होते. घटनास्थळी हे सगळे कामगार वेदनेने विव्हळत, तडफडत असल्याचे दृश्य पाहून मदतीसाठी धावलेले गावकरी हेलावून गेले.
कसून चौकशी करा
जवळपास शंभर फुटी लोखंडी शेडचे स्ट्रक्चर कोसळण्याचे नेमके कारण काय, बांधकामात काही निष्काळजीपणा झाला होता का, सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची सखोल चौकशी करा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. या घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवले. सुभाष यादव या कामगाराच्या डोक्यावर आणि मानेवर लोखंड पडून तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अनिकेत यादव, सुभाष शहाणे, जसवंत कुमार, अन्वर अंसारी, रमेश साहू, अंदाज यादव, मनीष सागर, धोंडू कांत, सुनील राऊत, रमेश सावंत, जाखीर अंसारी, सौरभ प्रजापती, हरी ओम, सोनू कुमार हे कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
Comments are closed.