ज्ञानाचे स्वागत आहे—पण WhatsApp विद्यापीठाकडून नाही!
सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीदरम्यान लक्षवेधी टिप्पणी : शशी थरूर यांचा केला उल्लेख
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सर्व प्रख्यात लेखक आणि विचारवंतांच्या विचारांचा आम्ही सन्मान करतो, परंतु ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’कडून मिळालेल्या माहिती किंवा ज्ञानाला न्यायालयात स्वीकारले जाऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. ही टिप्पणी 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने धार्मिक स्थळांवर (उदाहरणार्थ केरळचे शबरीमला मंदिर) महिलांसोबत होणारा कथित भेदभाव आणि विविध धर्मांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि त्याच्या कक्षेवरून दाखल याचिकांवर सुनावणी करतान केली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या 9 सदस्यीय घटनापीठाचे अध्यक्षत्व सरन्यायाधीश सूर्यकांत करत आहेत.
न्यायालयात काय घडले?
सुनावणीदरम्यान दाऊदी बोहरा समुदायाच्या वतीने वरिष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. कौल यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा दाखला दिला. या लेखात धार्मिक विषय व दिलाशाप्रकरणी ‘न्यायिक संगम’(न्यायालयांचा हस्तक्षेप टाळणे)चा मुद्दा मांडण्यात आला होता.
सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया
प्रख्यात व्यक्तिमत्त्वं, न्यायवृंद इत्यादींचा सन्मान करतो, परंतु वैयक्तिक मत हे केवळ वैयक्तिक मतच असते असे सरन्यायाधीशांनी नमूद केले. यावर कौल यांनी ज्ञान कुठल्याही स्रोताकडून मिळविले जाऊ शकते, ज्ञान आणि बुद्धिमत्ता कुठलाही स्रोत किंवा विद्यापीठातून येत असेल तर त्याचे स्वागत केले जावे असा युक्तिवाद केला.
न्यायाधीशांनी घेतली फिरकी
कौल यांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश नागरत्ना यांनी मजेशीर स्वरुपात परंतु ‘व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटी’मधून अजिबात नाही अशी टिप्पणी केली. कुठली युनिव्हर्सिटी चांगली आहे किंवा वाईट या चर्चेत पडू इच्छित नाही. परंतु ज्ञान जेथून मिळेल तेथून ते स्वीकारले जावे इतकाच मूळ मुद्दा असल्याचे कौल यांनी म्हटले आहे.
धार्मिक प्रथांवर दृष्टीकोन
कुठल्याही धर्म विशेषची कोणती प्रथा अनिवार्य आहे आणि कोणती बिगर अनिवार्य हे ठरविण्यासाठी निकष तयार करणे कुठल्याही न्यायिक मंचासाठी अत्यंत अवघड असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले होते.
Comments are closed.