‘आज माझा तरी शेवट नाहीतर…पुढच्याचा’; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला स
कोल्हापूर गुन्हे: ‘आज माझा तरी शेवट नाहीतर…पुढच्याचा’ असा मोबाईलवर स्टेट्स ठेवून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur news) पेठवडगाव येथे भररस्त्यात ही धक्कादायक घटना घडली. अमृता कांबळे (वय 30) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती दीपक कांबळे (वय 35) याने कोयत्याने सपासप वार करुन तिची हत्या (Murder news) केली. दीपक हा अमृताच्या चारित्र्यावर वारंवार शंका घ्यायचा. याच कारणावरुन दीपक कांबळे पत्नीची हत्या करून ‘विषय संपवला’ म्हणत पतीने मिशीवर ताव मारत पळ काढला होता. कोल्हापूरच्या पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील परिसरात बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे वडगाव शहर एकच खळबळ उडाली आहे. (Kolhapur Crime news)
प्राथमिक माहितीनुसार, दीपक कांबळे आणि अमृता कांबळे यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. बुधवारी अमृता कांबळे या एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दीपक कांबळे तिकडे आला. त्याठिकाणी दीपक आणि अमृता यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी दीपकने त्याच्याजवळील कोयत्याने अमृता यांच्यावर एकापाठोपाठ एक वार केले. यामध्ये अमृता कांबळे गंभीर जखमी झाल्या. त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या होत्या.यानंतर अमृता कांबळे यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा जोरदार पाऊस सुरु होता. हा सगळा प्रकार पाहायला बघ्यांची मोठी गर्दीही जमली होती.
ही घटना घडली तेव्हा पेठवडगावच्या एसटी स्टँडच्या परिसरात अनेकजण उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडली. दीपक अमृता यांच्यावर कोयत्याने वार करत असताना काही तरुण त्याला रोखण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, दीपकने त्यांना म्हटले की, ‘ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका.’ यानंतर दीपकने अमृता कांबळे यांच्यावर कोयत्याने आणखी वार केले. यानंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे , काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकरल, लखन सावंत, कुलदीप मोहिते यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पथकानेही नमुने गोळा केले आहेत. सध्या पोलीस दीपक कांबळे याचा शोध घेत आहेत. तर अमृता कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
आणखी वाचा
Comments are closed.