गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण दोन टप्प्यांत सुरू करा, कोकण विकास समितीची रेल्वे बोर्डाकडे मागणी
गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर धावणाऱ्या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांचे आरक्षण दोन टप्प्यांत सुरू करण्यात यावे, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या गणपती स्पेशल गाड्यांच्या अप आणि डाऊन दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी एकाच वेळी आरक्षण सुरू केले जाते. त्यामुळे आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सर्व जागा भरत असून अनेक प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याची तक्रार वारंवार पुढे येत आहे.
समितीच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नियमित गाड्यांचे आरक्षणही दोन ते तीन मिनिटांत पूर्ण भरत असल्याने तासन्तास प्रतीक्षा करूनही अनेक कोकणवासीयांना निराश परतावे लागते. त्यामुळे यंदाच्या गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणासाठी अधिक सुलभ व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
अप आणि डाऊन प्रवासाचे आरक्षण वेगवेगळ्या तारखांना किंवा दोन स्वतंत्र टप्प्यांत सुरू केल्यास प्रवाशांना संपूर्ण प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होईल. तसेच तत्काळ कोट्यावरील ताण कमी होण्यास आणि आरक्षण प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, असा दावा समितीने केला आहे.
कोकणातील लाखो गणेशभक्त आणि चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.
Comments are closed.