दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात गुन्हा

नाशिक क्राईम न्यूज : नाशिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या कुटुंबाची तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील जुने सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका सराफ व्यावसायिकाने हा कोट्यवधींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याने गेल्या दोन वर्षांत मुर्तडक कुटुंबाशी जवळीक निर्माण केली होती. त्याने कुटुंबातील महिलांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या बहाण्याने दागिने दुप्पट करण्याची योजना सांगितली.

Nashik Gold Scam : घरच्या महिलांचे दागिने हडपले

संशयित सराफाने मुर्तडक यांच्या घरातील महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे दागिने ताब्यात घेतले. यामध्ये अशोक मुर्तडक यांच्या पत्नीकडील 100 तोळे, मुलीकडील 50 तोळे आणि सुनेकडील 50 तोळे असे एकूण 200 तोळे सोन्याचे दागिने (सुमारे 2 किलो सोने) दुप्पट करून देण्याच्या नावाखाली संशयिताने स्वतःकडे ठेवून घेतले.

Panchavati Police Station : दीड वर्ष केवळ वेळकाढूपणा, अखेर गुन्हा दाखल

सोन्याचे दागिने ताब्यात घेतल्यानंतर संशयित सराफाने अनेक महिने कोणतीही परतावा दिला नाही आणि दागिनेही परत केले नाहीत. संशयिताच्या हालचालींवर संशय आल्याने घरातील महिलांनी हा संपूर्ण प्रकार अशोक मुर्तडक यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुर्तडक यांनी संशयित योगेश दाभाडे याच्याकडे मूळ सोने परत मागितले. मात्र, त्याने विविध कारणे सांगत तब्बल दीड वर्ष वेळकाढूपणा केला. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या हायप्रोफाईल फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.