Kurla Accident बेस्टला ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वाराची टेम्पोला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुर्ला पश्चिम परिसरात मंगळवारी सकाळी बेस्ट बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोर असलेल्या टेम्पोला धडकल्याने २५ वर्षीय बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजय गुणवंत पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडला. वांद्रे टर्मिनस ते कुर्ला बस स्थानक या मार्गावर धावणारी बेस्ट बस बुध कॉलनी परिसरातून जात होती.

याच वेळी आपली स्कुटी घेऊन जाणारा अजय पाटील याने बसला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसच्या पुढे असलेल्या एका टेम्पोला त्याची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे तो रस्त्यावर कोसळला आणि थेट बसच्या पुढील व मागील चाकांच्या मधोमध आला. बसच्या उजव्या बाजूच्या मागील एक्सेलजवळ डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्तबंबाळ झाला.

अपघातानंतर त्याला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. अपघातग्रस्त बस धारावी आगाराची असून ती ‘मातेश्वरी’ कंपनीमार्फत चालवली जात होती. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.