अवैध रेती, मुरूम आणि भिसी माती उत्खननातून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा आरोप, तहसीलदारांविरोधात थेट ईडीकडे तक्रार
शासनाच्या तिजोरीवरच डल्ला मारल्याचा गंभीर आरोप आता थेट ईडीपर्यंत पोहोचला आहे! चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयात अवैध गौण खनिज उत्खननाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहारात मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे यांच्यासह त्यांच्या अधीनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात केवळ अवैध उत्खननच नव्हे, तर त्यामागील कथित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी सरपंच अशोक मार्गनवार यांनी मुंबई येथील सक्तवसुली संचलनालयच्या संयुक्त संचालकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ईडी या तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेती, मुरूम आणि भिसी माती यांसारख्या गौण खनिजांचे कथित अवैध उत्खनन आणि वाहतूक करून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात मूल तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तहसीलदार मृदुला मोरे यांच्यासह त्यांच्या अधीनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. अवैध उत्खनन करणारे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचारी यांच्यात संगनमत असल्याचा संशयही तक्रारदाराने व्यक्त केला आहे. गौण खनिजांच्या उत्खननातून शासनाला मिळणारा महसूल नेमका किती अपेक्षित होता आणि प्रत्यक्षात किती महसूल जमा झाला, याची पडताळणी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. उत्खननासाठी देण्यात आलेल्या परवानग्या, प्रत्यक्ष उत्खननाचे प्रमाण, वाहतुकीची कागदपत्रे, रॉयल्टी वसुली आणि शासनाच्या तिजोरीत जमा झालेल्या महसुलाचा ताळमेळ तपासल्यास या कथित गैरव्यवहाराचे गांभीर्य समोर येऊ शकते, असा दावा तक्रारदाराने केला आहे. माजी सरपंच अशोक मार्गनवार यांनी यापूर्वीही या प्रकरणासंदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता त्यांनी थेट केंद्रीय तपास यंत्रणेच्या दारात धाव घेतली आहे. मुंबई येथील सक्तवसुली संचलनालयाच्या संयुक्त संचालकांकडे लेखी तक्रार सादर करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कथित अवैध उत्खननातून निर्माण झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी आणि शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. आता या तक्रारीनंतर ईडी नेमकी काय भूमिका घेते, तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू होते का आणि मूल तहसील कार्यालयातील कथित गौण खनिज गैरव्यवहाराचे सत्य बाहेर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे शासन महसूल वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे गौण खनिजांच्या कथित अवैध उत्खननातून कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येणार का, हा खरा प्रश्न आहे.
Comments are closed.