बनाव रचून वृध्दाला कारमध्ये जिवंत जाळलं; दोन सीम बंद करून तिसऱ्या सीमवरून मैत्रिणीशी चॅटिंग…घ
लातूर : एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) उघडकीस आली. पोलिसांनी (Police) घडल्या प्रकाराचा अवघ्या 24 तासांत छडा लावल्याने या घटनेचं सत्य उलगडलं आहे. डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून करण्यात आल्याची खळबजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली. तीन वर्षांपूर्वी एक कोटींचा विमा काढला आणि फ्लॅटच्या ५७ लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी त्याने कट रचून कारमध्ये एकाला जिवंत जाळलं. हे सर्व केल्यानंतर त्याने त्याचे दोन सीम बंद केले आणि तिसऱ्या सीमवरून आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग केली. यामुळेच तो फसला आणि अवघ्या २४ तासांत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कारमध्ये जिवंत जाळून त्याचा मृत्यू झाला असा बनाव करणाऱ्याचा पोलिसांनी पर्दाफाश करत मुसक्या आवळल्या असून, गुन्हेगारी डावच पोलिसांनी उधळून लावला आहे.
Latur Crime News: हातातील कड्यावरून आणि कारच्या नंबरवरून गणेश चव्हाणच्या कुटुंबीयांशी संपर्क
मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रोडवर एका कारला आग लागल्याचा कॉल डायल ११२ वर आला. घटनेचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्यात आला. कारमध्ये आढळून आलेल्या हातातील कड्यावरून आणि कारच्या नंबरवरून गणेश चव्हाणच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात आला. कुटुंबीयांनी यावरून कारमध्ये जळालेला सांगाडा हा गणेश चव्हाणचाच असल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी तपासाला गती दिली. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून गणेश चव्हाण याच्याकडे असलेले दोन मोबाइल समोर आले. हे दोन्ही क्रमांक बंद आढळून आले.
Latur Crime News: चव्हाण तर कारमध्ये जळाला असेल तर चॅटिंग कोण करत आहे?
दरम्यान, त्याने शेवटी सर्वाधिक कॉल कोणाला केले? याचा देखील पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केला. गणेश चव्हाण एका महिलेशी बोलत असल्याचे तपासावेळी समोर आलं. यातूनच तो तिच्याशी चॅटिंग करत असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान समजले. मग गणेश चव्हाण तर कारमध्ये जळाला असेल तर चॅटिंग कोण करत आहे? या प्रश्नाने पोलिसांना चक्रावून सोडलं. मग पोलिसांनी त्याच्या तिसऱ्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनचा शोध घेतला. तो रात्री कोल्हापूरमध्ये असल्याचे समोर आले. पुन्हा काही तासांनी तो तळकोकणात बसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करत त्याला विजयदुर्ग येथे अटक केली. त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला
तर या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण याने व्यक्तीला सीटबेल्ट लावून बसवले होते. सीटवर काडीपेटीतील काड्या टाकल्या व पेटवले. कार पूर्णतः पेट घ्यावी म्हणून पेट्रोल टाकीचे झाकन उघडे ठेवले होते. तुळजापूर मोडपर्यंत तो पायी गेला. तेथून खासगी बसने कोल्हापूर गाठले. पुढे तो एसटीने विजयदुर्गकडे गेला. कोकणातून त्याला अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.