10 सामन्यांची बंदी अन् कोटींचा दंड! FIFA WC26 फायनल वाद प्रकरणात अर्जेंटिना-स्पेनच्या खेळाडूंना शिक्षा

फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) स्पर्धेचा अंतिम सामना जितका रोमांचक होता, तितकाच वादग्रस्तही होता. या सामन्यात अनेक नियमांचे उल्लंघन झाले, त्यावर फुटबॉल जागतिक नियामक संस्थेने महिन्याभरातच आपला निर्णय दिला आहे. फिफाने स्पेनचे खेळाडू, अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन (AFA) आणि अर्जेंटिनाचे खेळाडू-कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे.
न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर खेळला गेलेला विजेतेपदाचा हा सामना स्पेनने 1-0 असा जिंकला. हा सामना संपल्याचे घोषित करताच अर्जेंटिनाचे आणि स्पेन संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले होते. यावर फिफाने त्यांचा निर्णय जाहीर केला आहे.
फिफाने अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिआंद्रो पारेडेस याला सर्वात मोठी शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर तब्बल 10 सामन्यांची बंदी ठोठावली आहे, तर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवरही दंड ठोठावण्यात आला आहे. डिफेंडर नहुएल मोलिना याच्यावर सात सामन्यांची आणि थियागो अल्माडा याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली.
पारेडेसला हल्ल्याच्या दोन आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. त्याने संघर्षावेळी शारीरिक आक्रमकता दाखवली होती. त्यामुळे त्याला सामन्यांच्या बंदीबरोबर 90,000 डॉलर्स म्हणजेच 83 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तेवढाच दंड मोलिनालाही झाला आहे, तर अल्माडाला 30,000 डॉलर्स म्हणजेच 29 लाख रुपयांचा दंड झाला आहे.
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवरही दंडात्मक कारवाई
फिफाने अर्जेंटिनाच्या केवळ खेळाडूंनाच नाहीतर फेडरेशनवरही कारवाई केली आहे. फिफाने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवर सुमारे 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेसाठी फिफाने संपूर्ण स्पर्धेदरम्यान अर्जेंटिनाकडून झालेल्या चुकांचा आढावा घेतला. झालेला हा प्रकार एक साधासुधा वाद नाही, तर यामध्ये भेदभावपूर्ण घोषणाबाजी किंवा हावभाव, सांघिक शिस्त आणि राजकिय संदेश असलेल्या बॅनर यांचा समावेश आहे.
उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी फॉकलंड बेटांसंदर्भात एक बॅनर झळकावला होता, जो दोन देशांमधील वाद आहे. या प्रकारामध्ये शिक्षा म्हणून फिफाने त्यांच्या पुढील दोन घरच्या सामन्यांसाठी केवळ 50% चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवाणगी दिली आहे.
स्पेनच्या पाब्लो मार्टिन पाएझ गाविरा, अर्थातच गावी यालाही शिक्षा झाली आहे. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून त्याला 30,000 डॉलर्स म्हणजेच 29 लाखांचा दंड लावण्यात आला आहे. (Leandro Paredes Argentina players staff have been sanctioned following breaches during fifa World Cup 2026 Final vs Spain)
Comments are closed.