लखनऊने मॅच जिंकली होती, मात्र पंचांच्या चूकीमुळे गमावला सामना? व्हायरल पोस्टमागचे सत्य
आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (२६ एप्रिल) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडले. हा सामना या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला. केकेआर यामध्ये विजयाच्या अगदी जवळ पोहोचले होते, मात्र शेवटच्या षटकातील दोन नो-बॉल आणि मोहम्मद शमीने मारलेल्या शेवटच्या चेंडूवरील षटकाराने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यामध्ये एलएसजी हरला. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहे, ज्याच्यानुसार पंचांच्या चुकीमुळे एलएसजीने सामना गमावला.
जेव्हा एलएसजीची फलंदाजी सुरू होती तेव्हा कर्णधार रिषभ पंतने मारलेला एक शॉट फाइन-लेगवरून सीमारेषेपार गेला आणि पंचांनी त्याला चौकार दिला. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की तो चौकार नाहीतर षटकार होता. हा निर्णय मैदानावरील पंचांनी दिला आणि तिसऱ्या पंचांच्याही लक्षात ते आले नाही. ही घटना १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घडली आणि गोलंदाजी कार्तिक त्यागी होता.
पंतने मारलेला तो शॉट एका विशिष्ट ऍंगलने पाहिला तर चेंडू न उसळता सीमारेषेपार गेल्याचा दिसत असला तरी इतर कॅमेरामधून तो दोरीच्या अगदी आधी उसळल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे पंचांचा चौकार देण्याचा निर्णय योग्य होता.
या सामन्यात केकेआरने एलएसजीला १५६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात एलएसजीने तेवढ्याच धावा केल्या आणि सुपर ओव्हरमध्ये केकेआर जिंकला. या सामन्यानंतर पंत म्हणाला, “मला वाटतं की आम्हाला नक्कीच थोडा ब्रेक घ्यायला हवा. आम्ही स्वतःला रीफ्रेश करू. दबाव तर नेहमीच असणार, प्रत्येक सामना हा प्रेशरचा असतोच. पण त्याचवेळी आम्हाला उत्तरं बाहेर नाही तर स्वतःमध्ये शोधायला हवीत. गोष्टी सोप्या ठेवायला हव्यात. आणि प्रत्येक खेळाडूने स्वतःची जबाबदारी स्वीकारायला हवी.”
Comments are closed.