भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार, उद्धव ठाकरे यांचा निर्णय शिरसावंद्य
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी शिरसावंद्य असून हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून काँग्रेस त्याचे समर्थन करते, भाजपच्या विरोधात यापुढेही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे लढू, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात गांधी भवन येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यानंतर हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली असून त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार नाही, अशी घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते-आमदार अनिल परब, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, काँग्रेस गटनेते सतेज पाटील, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
आमची आघाडी मजबूत – अनिल देसाई
अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसने माघार घेतली असे यामध्ये काहीच नाही. आघाडीतील तीनही पक्षांनी चर्चा करून ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्यात बिनसले आहे असे काहीही नाही, आघाडी मजबूत आहे, असे अनिल देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
Comments are closed.