पीएमजीपी रहिवाशांचा वनवास संपणार, शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पुनर्विकासाला मिळणार गती; पर्यायी निवास करारनाम्यावर रहिवाशांनी केली स्वाक्षरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या 15 वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अंधेरी पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांचा वनवास अखेर संपणार आहे. शिवसेनेच्या प्रयत्नामुळे धोकादायक अवस्थेत असलेल्या पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. आज इमारत क्र. 10 मधील काही रहिवाशांनी पर्यायी निवास करारनाम्यावर (PAAA) स्वाक्षरी केली. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून बांधकामासाठी ईपीसी कंत्राटदार म्हणून बी. जी. शिर्पे कन्स्ट्रक्शनची निवड करण्यात आली आहे.

अंधेरी पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून पावसाळय़ात वारंवार येथे स्लॅब कोसळून रहिवासी जखमी होण्याच्या घटना घडतात. शिवसेनेच्या प्रयत्नामुळे या वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होणार आहे. करारनाम्यानुसार, सध्या 180 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया रहिवाशांना 448 चौरस फुटांचे घर तर 270 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया रहिवाशांना 672 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. याशिवाय व्यावसायिक गाळेधारकांनादेखील वाढीव क्षेत्रफळ मिळणार आहे. रहिवाशांना दरमहा 20 हजार याप्रमाणे सुरुवातीला तीन वर्षांचे एकत्रित भाडे दिले जाणार आहे. शिफ्टिंग चार्ज 20 हजार रुपये तर दोन लाख रुपये कॉर्पस फंड दिला जाणार आहे. रहिवाशांना किमान 25 हजार रुपये भाडे मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अनंत नर यांनी सांगितले.

रहिवाशांनी मानले शिवसेनेचे आभार

अंधेरीतील पीएमजीपी या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी विकासक तयार होत नसतील तर म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात यावा, असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 मे 2022 रोजी म्हाडाला दिले होते. त्यानुसार या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. पुनर्विकासासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी गेल्या दीड वर्षापासून सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री, म्हाडा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Comments are closed.