महाडमध्ये शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन, महाआरतीने श्रीराम मंदिर दणाणले
अयोध्येच्या मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांची तिजोरी लुटणाऱ्या लुटारूंविरोधात आज महाडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार रामरक्षा आंदोलन केले. श्रीराम मंदिरासमोर हजारो शिवसैनिक आणि महाडकरांनी एकत्र येत महाआरती करून अवघा चवदार तळे परिसर दणाणून सोडला. दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राम मंदिरातील कोट्यवधी रुपये चोरणाऱ्या लुटारूंना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरीविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाडमध्ये ही ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ असलेल्या वीर बापूराव जोशी चौकातील श्रीराम मंदिरात शिवसैनिकांनी रामरक्षा व महाआरती आंदोलन केले. रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रभू रामचंद्रांचे पूजन केले. त्यानंतर रामरक्षा पठण करण्यात आले. हनुमान स्तोत्र व महाआरतीच्या गजराने अवघा चवदार तळे परिसर दणाणून गेला.
यावेळा जिल्हा महिला संघटक डॉ. स्विटी गिरासे, जिल्हा सल्लागार नरेश अहिरे, उपजिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे, महाड तालुकाप्रमुख आशिष फळसकर, शहरप्रमुख मंगेश देवरुखकर, माणगाव तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत यादव, तृप्ती रत्नपारखी, जनार्दन मानकर, लहु लुष्ठे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक व महाडकर नागरिक उपस्थित होते.
श्रीरामाच्या पैशांनी आमदार, खासदार चोरले
सत्तेत येण्यासाठी भाजपने हिंदूंचा आणि राम मंदिराचा वापर केला आणि प्रभू रामचंद्राच्या दानपेटीतील रक्कम आमदार आणि खासदारांना चोरण्यासाठी वापरली, असा आरोप संजय कदम यांनी केला. तर हे आंदोलन देशभरात पोहचायला हवे आणि दानपेटी चोर जिथे दिसतील तिथेच त्यांना फटकवायला हवे, असे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के म्हणाले.
Comments are closed.