परळीतील महादेव मुंडेप्रकरणी आज दोघांची ‘नार्को’, एकाची ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणी; आतापर्यंत काय काय
महादेव मुंडे मृत्यू प्रकरण: बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निघृण हत्या (Mahadev Munde Death Case) प्रकरणात दोघांची ‘नार्को’, एकाची ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणी करण्यात येणार आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या एसआयटीने तसा निर्णय घेतला आहे. महादेव मुंडे यांची हत्या होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असून, आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. मंगळवारी उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल.
‘ते’ सहा जण कोण? (Mahadev Munde Death Case)
एसआयटीने सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता. एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्याची तपासणी नाकारण्यात आली. आता 6 जणांच्या चाचणीला परवानगी मिळाली. ज्या पहिल्या तिघांची चाचणी पार पडली, ते सर्व जण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते, तर मंगळवारी होणाऱ्या चाचण्यांमधील दोघे जण वाल्मीक कराड याच्या घरी कामाला होते तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.
कसा झाला आहे या प्रकरणाचा तपास- (Mahadev Munde Death Case)
एसआयटीने गेल्या सहा महिन्यांत सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली आहे. 150 हून अधिक संशयित आणि 500 हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपासाची चक्रे फिरली आहेत.
नेमकं प्रकरण काय? (महादेव मुंडे मृत्यू प्रकरण)
20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचापरळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली आहे. आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. हत्या केल्यानंतर वाल्मीक कराडनं टेबलावर मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं, दावा बाळा बांगर यांनी केला होता.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.