पालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेचं मनोमिलन, विरोधकांना रोखणार? दिल्ली आदेशानंतर एकत्र लढण्यावर ठाम

मुंबई : नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीतील झालेले मतभेद आणि मनभेद दूर सारण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसतो आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार निवड, पदाधिकारी गटबाजी, आणि संघटनात्मक स्पर्धा यामुळे दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला होता. मात्र, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता हे मतभेद सोडवण्याची राजकीय गरज दोन्ही पक्षांनाही भासू लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावल्यानंतर त्याची धग अगदी कल्याण-डोंबिवली महापालिकेत येऊन पोहोचली होती. अशात, घरापर्यंत ही धग पोहोचल्याने शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एकनाथ शिंदे थेट गृहमंत्री अमित शाहांच्या दारी पोहोचले आणि त्यांच्याकडून यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले गेले.

शिवसेना-भाजप सर्व महापालिका एकत्र लढवण्यावर एकमत

दरम्यान, त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत संघर्ष संपवावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अशात, हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. याबैठकीत दोन्ही पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर, लगेच भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिल्ली गाठत अमित शाहांसोबत चर्चा केली आणि दुसऱ्याच दिवशी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत जवळपास सर्व महापालिका एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं.

नगर परिषद आणि नगर पालिकेत झालेले वाद महापालिका निवडणुकीत संपुष्टात येणार

भाजप आणि शिवसेनेत झालेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून केला जात असल्याचं दिसतं. प्रखर्षाने, दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाल्याचं चित्र दाखवण्याची प्रयत्न केला जात असल्याचं दिसतं. दरम्यान, या सर्व नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपच्या इमेजला जो धक्का बसला होता तो दूर करण्याचा प्रयत्न मागील काही बैठकांमधून होत असल्याचं स्पष्ट होत आहे. सोबतच, महायुती म्हणून आपण एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. विरोधकांना महापालिका निवडणुकीत संधी न देता पालिकांवर पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाले आहे. त्यामुळे नगर परिषद आणि नगर पालिकेत झालेले वाद महापालिका निवडणुकीत संपुष्टात येतात का? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंना सांगितला इतिहास, विधानसभा अध्यक्षांची भेट

आणखी वाचा

Comments are closed.