महायुतीकडून शेतकऱ्यांची थट्टा, 1287 किलो कांद्याला मिळाले फक्त 1468 रुपये
महायुती सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा सुरू आहे. कांद्याला सरकारकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. सोलापुरातील शशिराव तोदेकर या शेतकऱ्याने पिकवलेल्या 1287 किलो कांद्याला सरकारकडून फक्त 1468 रुपये मिळाले. म्हणजेच प्रतिकिलोला फक्त 1 रुपया 14 पैसेच सरकारने दिले. तसेच तो कांदा वाहून आणण्याचे 301 रुपये वाहनभाडेही तोदेकर यांच्याच खिशातून गेले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शेट्टी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत फडणवीस यांना जाब विचारला आहे तसेच सातारा येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर केलेल्या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली
आहे.
देवाभाऊ, कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करताय की व्यापाऱ्यांचा?
राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देवाभाऊ कांदा व्हाटसअप, इन्स्टाग्राम व फेसबुकवर विकत घ्यायचा नाही, तर तो शेतकऱयाकडून विकत घ्यायचा होता. देवाभाऊ ऊर बडवून सांगत आहेत, राज्य सरकार कांदा 12 रुपये 35 पैसे किलोने खरेदी करत आहे. शशिराव तोदेकर या शेतकऱ्याचा कांदा सरासरी 1 रुपये 14 पैसे किलोने विकला गेला आहे. तोदेकर यांना हमाली, तोलाई, वाहनभाडे मिळून एकूण 1769 रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे तोदेकर यांनाच जवळचे 301 रुपये द्यावे लागले आहेत. देवाभाऊ नेमकं कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करताय की व्यापाऱ्यांचा हे जरा जनतेला सांगा, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
Comments are closed.