नवी मुंबईत १०४ वृक्ष धोकादायक, साडेतीन हजार झाडांच्या फांद्या कापल्या
पावसाळ्यात झाडे कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांतर्गत शहरात १०४ झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने ५८ धोकादायक झाडांची छाटणी पूर्ण केली आहे. सुमारे ३ हजार ५७१ झाडांच्या धोकादायक फांद्याही कापण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडांचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली. या सर्वेक्षणामध्ये शहरात तब्बल १०४ धोकादायक वृक्षांची नोंद करण्यात आली. अतिधोकादायक असलेल्या ५८ झाडांची छाटणी पूर्णपणे करण्यात आली आहे. अन्य झाडांच्या धोकादायक फांद्या हटवण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या उद्यान विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणे, मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे तसेच दिवाबत्तीस अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्यांची छाटणी युद्धपातळीवर सुरू आहे.
शहरातील जवळपास ५७४ ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली असून धोकादायक ठरणाऱ्या फांद्या हटवण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुकलेल्या व धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले.
शहरातील झाडांच्या धोकादायक स्थितीचा अभ्यास करून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या भागात फांद्या कापण्याची आवश्यकता आहे, याची यादी तयार करून काम सुरू असल्याची माहिती उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांनी दिली.
पालिकेच्या या मोहिमेमुळे पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.