कांद्याला कवडीमोल भाव अन् कर्जाचा डोंगर, कांदा उत्पादक शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा; नाशिकमधील
नाशिक वार्ता: बदलते हवामान (Climate Change), बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव (Low Market Prices) आणि बँकेच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या सटाणा (Satana) तालुक्यातील राहुड येथे एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुलाब केशव निकम (वय 59) असे जीवनयात्रा संपवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण राहुड गावावर आणि सटाणा परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत गुलाब निकम हे केवळ तीन एकर शेतीवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ते अडचणीत आले होते. त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते.
Nashik News: शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
एकीकडे पिकाचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने निकम यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. या दुहेरी संकटामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. याच नैराश्यातून अखेर त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
Nashik News: कांद्याला मिळेना भाव; नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला
दरम्यान, नाशिक जिल्हा ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, याच बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच डिझेलचा तुटवडा असल्याने शेतीचे कामेही खोळंबली आहे. शेती नांगरणी, मशागत, पेरणी या सगळ्याच अडचणी शेतकऱ्यांसमोर केवळ डिझेल तुटवड्यामुळे उभ्या राहिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारचे शेतकऱ्यांप्रती चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये हमीभाव द्या, कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान द्या, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.