चार दिवस सरकार ‘ऑफलाईन’!
महायुती सरकार पुढील चार दिवस ऑफलाईन असणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून डेटा सेंटर स्थलांतर आणि सिस्टम अपग्रेडच्या कामामुळे ऑनलाईन सेवा उद्या दुपारी 4 पासून 19 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. 20 ऑक्टोबरपासून त्या पूर्ववत होणार असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
तांत्रिक कारणास्तव सरकारची ऑनलाईन सेवा बंद ठेवली जाणार असल्याने विविध सरकारी पोर्टल, संकेतस्थळे, मोबाईल अॅप तसेच सेवा केंद्रांवरील काम बंद राहणार आहे. त्यामुळे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे नागरिकांना संबंधित विभागांमध्ये जाऊन ऑफलाईनच घ्यावी लागणार आहेत. या चार दिवसांच्या कालावधीत सरकारी योजनांच्या लाभाचे पैसे थेट बँक खात्यांमध्ये जमा करता येणार नाहीत.
या सेवांना फटका
- ‘आपले सरकार’ पोर्टल – विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि नागरी सेवा पूर्णपणे बंद राहतील.
- डीबीटी पोर्टल – थेट लाभ हस्तांतरणाशी संबंधित सेवा प्रभावित होतील.
- भूमी अभिलेख विभाग – डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा व जमिनीचे अन्य उतारे या चार दिवसांत मिळणार नाहीत.
- महाआयटीमार्फत चालवली जाणारी विविध शासकीय संकेतस्थळे, मोबाईल अॅप बंद राहतील.
- ऑनलाईन अर्जाची किंवा कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत या चार दिवसांत संपत असेल तर संबंधित सरकारी विभागाशी संपर्क साधून मुदतवाढ घ्यावी.
Comments are closed.