जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
मुंबई : जून महिन्याचा पगार जमा झाल्यानंतर अनेकांना मे महिन्याच्या तुलनेत पगार 25 रुपयांनी कमी झाल्यांच पाहायला मिळतं. जून महिन्याच्या पगारातून 25 रुपयांची कपात करुन ते कुठं जमा केले जातात यासंदर्भात अनेकांना माहिती नसतं. यासंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. जून आणि डिसेंबर महिन्याच्या पगारातून कपात करण्यात येणारी 25 रुपयांची रक्कम महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड) मध्ये जमा केली जाते.
जूनच्या पगारातील 25 रुपये कुठे जमा होतात?
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 नुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यात कार्यरत आहे. राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी या मंडळाकडून काम केलं जातं. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953मधील तरतुदींनुसार सहा महिन्यातून एकदा 25 रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून मंडळाकडे जमा केली जाते. तर, मालक किंवा कंपनीमार्फत प्रति कर्मचारी 75 रुपये अशी रक्कम महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंडमध्ये जमा केली जाते. राज्यातील कारखाने, दुकाने किंवा आस्थापनांमध्ये 5 हून अधिक कामगार कार्यरत असतील तर त्यांना ही रक्कम भरावी लागते.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे जमा झालेल्या निधीतून कामगारांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ कर्मचारी घेऊ शकतात. या योजनांमध्ये अर्थसहाय्य केलं जातं, यासंदर्भातील अधिक माहितीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या https://public.mlwb.in या वेबसाईटला भेट द्या.
- सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना
- परदेश शैक्षणिक अर्थसहाय्य योजना
- क्रीडा अर्थसहाय्य योजना
- पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना
- एमएससीआयटी अर्थसहाय्य योजना
- शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा आर्थिक सहाय्य योजना
- साहित्य प्रकाशन अनुदान योजना
- शिवयंत्र अनुदान योजना
- गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना
- वाहनचालक प्रशिक्षण अर्थसहाय्य योजना
या योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून चालवल्या जातात. तर, कामगारांना विविध पुरस्कार दिले जातात. कामगार व महिलांसाठी स्पर्धा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. नाट्य महोत्सव, नाट्य प्रशिक्षण शिबिर यासह इतर महत्त्वाचे कार्यक्रम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून राबवले जातात.
लाभ कोणाला घेता येतो?
सर्व बँका, दुकाने, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप, हॉटेल्स, उपहारगृह, हॉस्पिटल्स, ट्रान्सपोर्ट/टूरिस्ट कंपनी, केंद्र व राज्य शासनाच्या अंगीकृत असलेले सर्व उद्योग/आस्थापना यात काम करणारे नियमित, हंगामी, कंत्राटी कामगार/कर्मचारी यांना मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदित कामगार व कामगार कुटुंबीयांना देखील मंडळाच्या उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेता येतो.
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Comments are closed.