महाराष्ट्र ज्वाळा-मुखी! अमरावतीत सर्वाधिक 46.06 तापमान; मुंबईत पारा 34.3 परंतु आर्द्रता 80 टक्के
गेल्या काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नागरिकांची होरपळ होत असताना आज पाऱ्याने थेट 46 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला. अमरावतीत आज सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. शिवाय विदर्भातील 11 जिह्यांत पारा 43 ते 45 अंशांवर राहिल्याने नागरिकांच्या जिवाची काहिली झाली. कोकणासह विविध भागांमध्येही चाळिशी पार गेलेला पारा आणि दमट हवामानामुळे संपूर्ण महाराष्ट्रच अक्षरशः ‘ज्वाळा’मुखी असल्याची स्थिती निर्माण झाली.
देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोला आणि अमरावतीचा समावेश झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शहरांचे तापमान सलग 45 अंश सेल्सिअसपर्यंत राहत आहे. यामुळे या ठिकाणी आतापर्यंत उष्माघाताने सात जणांचा बळीदेखील गेला आहे. एकीकडे कडाक्याचा उकाडा तर काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊसही होत आहे. त्यामुळे निर्माण होणार्या आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हाच्या वेळी रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सर्वाधिक तापमान असलेल्या अकोल्यात प्रशासनाने 18 वातानुकूलित बेडची व्यवस्था केली आहे.
त्वचेची काळजी घ्या!
कडक उन्हामुळे ‘सनबर्न’, त्वचा विकार, चेहऱ्यावर काळे चट्टे, रूक्ष होणे आदी प्रकार घडू शकतात. हे टाळण्यासाठी उन्हापासून बचाव करणारी वेगवेगळी साहित्ये, औषधी क्रीम त्वचेवर लावली गेली पाहिजे. जेणेकरून कडक उन्हाचा त्वचेवर परिणाम होणार नाही. त्वचा तजेलदार राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे, त्वचेचा थेट उन्हाशी संबंध येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे जे.जे. रुग्णालयाचे त्वचा रोग आणि सौंदर्य तज्ञ डॉ. ऋषिकेश मुंडे यांनी सांगितले.
खिशात कांदा ठेवा, एसीची गरज लागणार नाही! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला उकाड्यावर उपाय
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज एक भन्नाट उपाय सांगितला. ‘डोक्याला पागोटे बांधा आणि खिशात कांदा ठेवा. गर्मीचा कसलाही त्रास होणार नाही. 51 डिग्री उष्णतेतही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहील,’ असा सल्ला ज्योतिरादित्य यांनी दिला. ‘मी स्वतः खिशात कांदा घेऊन फिरतो. गाडीची एसी लावत नाही. घरातही एसीमध्ये राहत नाही. ही चंबळची चामडी आहे,’ असेही ते म्हणाले.
माथेरानात रणरण
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्येही सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. या ठिकाणी आज 36.6 अंश इतके तापमान नोंदवले गेले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळवण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. गारवा सोडाच रणरणत्या उन्हामुळे पर्यटकांचे मोठे हाल झाल्याने अनेकांनी माथेरानमधून ताबडतोबच काढता पाय घेतला.
उष्माघाताची लक्षणे
फेफरे, कोमामध्ये जाणे, गरम लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस, 104 फॅरेनाईट, डोकेदुखी, चिंता, चक्कर येणे, मुर्च्छा येणे, स्नायू कमकुवत होणे, मळमळ आणि उलटी, हृदयाचे जलद ठोके पडणे, श्वास घेण्यास त्रास, जेवण्याची इच्छा न होणे, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा, खोल गेलेले डोळे, सुस्ती, जखडणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे.
- नागपूर 45
- अकोला 46.3
- पुणे 39.8
- रत्नागिरी 33.5
- नाशिक 39.8
Comments are closed.